ठाणे-बेलापूर मार्गावरील ऐरोली रेल्वे स्थानकानजीक अपघातांचे व वाहतूक कोंडीचे वाढते प्रमाण लक्षात घेता एमआयडीसीने स्कायवॉकची उभारणी केली आहे. या स्कायवॉकसाठी २ कोटी ९६ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. स्कायवॉकचे काम रंगरंगोटी आणि विद्युत रोषणाईसह पूर्ण झालेले असताना या स्कायवॉकचे उद्घाटन थांबले होते. पण नागरिकांची होणारी गौरसोय लक्षात घेता एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंत्यांच्या हस्ते त्यांचे लोकार्पण करण्यात आले. राजकीय रंगात उडी न घेता एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी याचे लोकार्पण करून स्कायवॉक नागरिकांसाठी खुला केला आहे.
ठाणे-बेलापूर मार्गावरील ऐरोली येथील माईंड स्पेस, अक्षरा तसेच पूर्व आणि पश्चिमला जाण्या-येण्याकरिता नागरिकांना मोठी कसरत करावी लागत होती. या ठिकाणी रस्ता ओलांडताना अनेक अपघातदेखील झाले होते. तर रोजच या ठिकाणी वाहतूक कोंडीने नागरिक बेजार झाले होते. या ठिकाणची भविष्यातील वाढती गर्दी लक्षात घेता एमआयडीसीने सुमारे २ कोटी ६९ लाख रुपये खर्चून सहा महिन्यांत स्कायवॉक उभारला आहे.
या स्कायवॉकमधून ज्येष्ठ नागरिकांना लिफ्टची सुविधा असून विशेष आकर्षक रोषणाई आहे. या स्कायवॉकमुळे ऐरोली परिसरातील कंपन्यांमध्ये येणाऱ्या कामगारांना अपघातांपासून बचाव करण्यासाठी मदत होणार आहे. एमआयडीसीने नियोजित वेळेत या स्कायवॉकचे काम पूर्ण केले. मागील महिन्याभरापूर्वी याचे काम पूर्ण झाले होते. राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक यांनी या स्कायवॉकच्या उभारणीसाठी पत्रव्यवहार करून पाहणी दौरा केला होता. स्कायवॉक नियोजित वेळेत बांधण्यात आल्यानंतरही उद्घाटन रखडले होते.
एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी राजकीय नेत्यांना दूर ठेवून शुक्रवारी या स्कायवॉकचे लोकार्पण प्रशासकीयपणे उरकून नागरिकांसाठी स्कायवॉक खुला केला.