करोनाकाळात बंद असलेली ऐरोली येथील सागरी जैवविविधता निसर्ग परिचय केंद्रात बोट सफर ५० टक्के आसनक्षमतेसह सुरू करण्यात आली असून याला पर्यटकांसह पक्षीप्रेमींकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यासाठी २५ जानेवारीपर्यंत आगाऊ नोंदणी झाली असून १५ ते २० दिवसांची प्रतिक्षा करावी लागत आहे.

थंडीचा कडाका वाढला असल्याने नवी मुंबईच्या खाडीकिनारी फ्लेमिंगोसह अनेक परदेशी पाहुणे विसावले आहेत. त्यांना पाहण्यासाठी पर्यटक येत असून ते बोट सफर करण्यास पसंती देत आहेत.

ठाणे ही आशिया खंडातील सर्वात मोठी खाडी आहे. २६ किलोमीटरच्या खाडी परिसरामध्ये २०० पेक्षा जास्त स्थलांतरीत पक्षी येत असतात. यामध्ये पेंटट स्टार्क, पाइट, स्टील्ट, गल, ग्लोवर आदी पक्षांचा समावेश असतो. यासह खाडीतील विविध प्रकारच्या जैवविविधतेची माहिती व खाडी किनाऱ्यांचे महत्व कळावे यासाठी ऐरोली येथील सागरी जैवविविधता निसर्ग परिचय केंद्रातर्फे बोट सेवा सुरू केली आहे.

करोना काळात ही बोट सफर बंद ठेवण्यात आली होती. टाळेबंदी शिथीलीकरणानंतर नोव्हेंबर महिन्यात ५० टक्के आसनक्षमतेसह ही सेवा सुरू करण्यात आली. २४ आसनी बोटिंग करिता १२ आसन तर ७ आसनी बोटिंगला ४ आसनांची मार्यादा ठेवण्यात आली आहे. करोनाकाळात या बोट सेवेला प्रतिसाद मिळेल की नाही याची शंका होती. मात्र हळूहळू थंडी वाढत गेल्यानंतर पर्यटकांनी या बाट सफरीला पसंती देणे सुरू केले आहे. हा प्रतिसाद मोठय़ा प्रमाणात असून आता २५ जानेवारीपर्यंत आगाऊ नोंदणी झालेली आहे.

महिनाभरात दीड हजार जणांकडून बोट सफर

नोव्हेंबरमध्ये बोटसेवा सुरू झाल्यानंतर सुरुवातीला करोना संसर्गाची भीती असल्याने पर्यटक या केंद्राकडे फिरकत नव्हते. डिसेंबरमध्ये पर्यटकांचा ओघ सुरू झाला. ५ डिसेंबर ते ८ जानेवरीपर्यंत एकूण १ हजार ६२२ नागरिकांनी या केंद्राला भेट दिली असून १ हजार ५४० जणांनी बोटिंग केले आहे. २५ जानेवारीपर्यंत ८०० जणांनी आगाऊ  नोंदणी केली आहे.

टाळेबंदीनंतर नोव्हेंबरमध्ये पुन्हा बोटिंग सफर सुरू करण्यात आली आहे. भरती ओहटीच्या वेळापत्रकानुसार सेवा दिली जात असून पर्यटकांनी मोठी पसंती दिली आहे. २५ जानेवारीपर्यंत आगाऊ नोंदणी झालेली आहे.

-एन जे कोकरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, ऐरोली