पर्यावरणवादी संस्थांची खारफुटी संवर्धन आणि संरक्षण समितीकडे तक्रार

उरण :  उरण परिसरात अनेक विकासकामे सुरू आहेत. यात जेएनपीटीच्या रस्ता रुंदीकरणाचे कामे सुरू असून मातीच्या भरावामुळे सुमारे अडीच हजार खारफुटी नष्ट करण्यात आल्याची तक्रार पर्यावरणवादी संस्थांनी उच्च न्यायालयाने गठीत केलेल्या खारफुटी संवर्धन आणि संरक्षण समितीकडे केली आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३४८ लगत असलेली धुतूम गावाजवळील मातीचा भराव सुरू असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले आहे. या गावाजवळ असलेल्या आयओटीएल कंपनीसमोर खारफुटीची झाडे दिसून येत असून मोठय़ा प्रमाणात खारपुटी या कामात नष्ट केली आहेत.

या परिसरात मातीचा भराव झाला आहे. हा भराव करण्यासाठी राज्य कोस्टल झोन मॅनेजमेंट अ‍ॅथॉरिटी आणि उच्च न्यायालयाची परवानगी आवश्यक होती. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे निसर्गप्रेमी संघटना नॅट कनेक्ट फाऊंडेशनने तक्रार केली आहे. दिवसाढवळ्या खारफु टी नष्ट केल्या जात असताना कोणत्याही प्रकारची चौकशी का केली जात नाही, असा सवाल पर्यावरणप्रेमींनी केला आहे. नवी मुंबईतील पर्यावरणवादी संघटना नॅट कनेक्ट फाऊंडेशन, श्री एकविरा आई प्रतिष्ठान, पारंपरिक मच्छीमार बचाव समिती येथील खारफुटीची होणारी कत्तल थांबवावी, अशी मागणी केली आहे.  सुमारे अडीच ते तीन हेक्टर जमिनीवर अशा प्रकारचा भराव करण्यात आलेला आहे. आजपर्यंत झालेल्या भरावापैकी कोणत्याही प्रकल्पाची माहिती देणारे फलक लावण्यात आलेले नाहीत. भराव टाकण्याच्या पद्धतीत स्थानिकांना काम देऊन जेएनपीटीकडून हात झटकण्याचे काम केले जात असल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

जेएनपीटी परिसरात सुरू असलेल्या विकास कामांना आमचा विरोध नाही. मात्र पर्यावरण व जैवविविधा नष्ट करून होणाऱ्या विकासावर निर्बंध आले पाहिजेत. अनेक ठिकाणची खारफुटी नष्ट केली जात आहे. या संदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. याकरिता स्थानिकांना कामे दिली जाऊन त्याच्या आडून ही कामे केली जात आहेत. 

– बी. एन. कुमार, नॅट कनेक्ट फाऊंडेशन