मिठागराची जागा तयार करण्यासाठी सोलकीखोदण्यापासून ते तयार मीठ वाहून नेऊन त्याची रास तयार करण्यापर्यंतची सर्व कामे कुटुंबातील सदस्यच करत. उन्हात राबून पिकवलेलंहे पांढऱ्याशुभ्र मीठ खोत मात्र कवडीमोलाने खरेदी करत असे. बहुतेक आगरे सरकारी जमिनीवर होती. त्यामुळे त्यांच्यावर समाजाचा हक्कच नसे. अशातही आनंदी राहून मिठागरी धवले मोतीपिकवणे समाजाने सुरूच ठेवले.

किनारी गो किनारी, समिंदराचे गो किनारी.

देवाची गो देवाची, माजे परशरामाची गो भूमी.

तिरावरी गो तिरावरी, उभे बांधांचे गो पारेकरी.

साठली गो साठली, नवरत्न गो दर्यामंदी.

पिकले गो पिकले, धवले मोती या मिठागरी.

परशुरामाच्या भूमीला गवसणी घालण्यासाठी किनाऱ्यावरील मूळनिवासींनी म्हणजेच आगरी समाजाने चक्क समुद्रालाच वेढा घातला. अतिशय मेहनत व चिकाटीने त्यांनी समुद्रालगतची पडीक जमीन भलेमोठे बांध घालून समुद्रतटापासून वेगळी केली आणि उदरनिर्वाहासाठी लांबलचक ‘आगर’ तयार केले. भातशेतीसाठी जागा तयार केली.

कुठलीही साधनसामग्री नसताना तयार केलेले अवजार म्हणजे ‘पेन्सा’. कंबरेपर्यंत उंचीची, वितभर रुंदीची, थोडीशी जाडसर, दोन्ही बाजूंनी धार केलेली व खाली निमुळती होत गेलेली लाकडी फळी म्हणजेच पेन्सा. त्याने समुद्रालगतच्या कडक चिखलातून ‘सोलकी’ (टणक चिखलाचे आयताकृती मोठे तुकडे) खणून सारे जण ‘जोळ’ (रांग) करून शक्य तेवढय़ा गतीने बांध बांधत. तेही समुद्राच्या लहरी म्हणजे भरती-ओहोटीच्या वेळा सांभाळून. चिखलातलं हे काम करताना त्यांचं शरीर, एखाद्या धातूच्या पुतळ्यासारखं बनत असे. सर्वच जण चिखलात माखून जात. काम करताना थकवा जाणवू नये म्हणून पारंपरिक गीते गात किंवा आगरी भाषेतील विडंबनात्मक कथा सांगत. त्याकाळी विनोदी सादरीकरणाचं कसबही या मंडळींकडे होतं. मिठागारांची निर्मिती म्हणजे वास्तुकलेचा अद्भुत आविष्कार होता.

कोंबरा कुकुचला का आयव उठाची,

आगरान जावाला आबवची गालन उराची.

लौटान, फोरनी, फलटी नं पेंडशी,

आगरांची आवजारा हातान पराची.

उबधाय चालत, चिखोल तुरवीत,

आगराचे बांधावं हजेरी लावाची.

मंग, कोंडय़ान सासलेला मीठ बगून,

आमची छातारा गर्वान फुगाची.

पून आबवला, घामान डबडबलेला बगून, मिठाचा गुन खार का? याची जानीव व्हवाची.

शेती-भातीचा हंगाम सरला की आगरी लोकांची पावलं आपसूक मिठागराकडे वळत. पावसाळ्यात आगरातील कोंडय़ांची बरीच पडझड होई. सणासुदीला घर स्वच्छ चकचकीत करावं तसंच ते आगराची डागडुजी करत. सूर्यदेव आपलं रौद्ररूप दाखविण्यास सुरुवात करी, पण आगऱ्यांना ते दुलईसम भासे. समुद्राचं स्वच्छ पाणी कोंडय़ांच्या बांधांमध्ये तयार केलेल्या मार्गाने (परे) साधारणत: ४-५ इंचापर्यंत कोंडय़ांमध्ये साठवलं जाई. उन्हामुळे त्याचं बाष्पीभवन होऊन काही दिवसांत कोंडीत मिठाचा थर तयार होत असे. सराईत सोनाराने ठोके मारून दागिन्याला आकार द्यावा तद्वतच हे आगरातील सराईत बापये (पुरुष) फोडणी व लौटानाच्या (बांबूच्या दांडय़ाला लावलेली लहान लाकडी फळी) साहाय्याने त्याचं मिठाच्या खडय़ांमधे रूपांतर करून ते बांधावर ओढून घेत. मिठागर दूरून पाहिल्यास भल्यामोठय़ा काळ्या कागदावर पांढऱ्या रंगाने आखलेल्या छोटय़ा छोटय़ा रकान्यांसारखं दिसे.

ते मीठ एकत्र करून ‘मिठाच्या पाटय़ां’मध्ये (बांबूची मोठ्ठी टोपली) भरून डोक्यावरून वाहून नेलं जाई. त्याची दूरवर साठवणूक केली जात असे. त्याची ‘रास’ (मोठ्ठा ढीग) होई आणि तळपत्या उन्हातही बर्फाच्या डोंगरांचा भास होई. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ‘पिकलेलं’ मीठ विक्रीस जावं, घरातल्या लक्ष्मीच्या रिकाम्या झालेल्या मडक्यात चार नाणी पडावीत, अशी भाबडी आशा असे. उन्हाने करपलेलं शरीर, हात आणि पायांना मिठाच्या खारवसाने पडलेल्या चिरा, तरीही अंगात १४ हत्तींचं बळ असलेला हा आगरकरी पैशांसाठी मात्र लाचार असे आणि याचाच फायदा खोत घेत. पाऊस सुरू होण्यापूर्वी जर मीठ विकलं गेलं नाही तर पुन्हा पदरी निराशा पडे. मिठाच्या राशीला पावसापासून वाचवण्यासाठी पेंडय़ाने आच्छादण्याचं, त्यावर चिखलाचा लेप लावण्याचं काम संपूर्ण कुटुंबावर येऊन पडे. या राशीलेपनाच्या कामात त्याची चिलीपिली आणि सहचारीणीही तेवढय़ाच उत्साहाने सहभागी होई.

त्याने पिकवलेल्या मिठाचा कधी लेखाजोखा ठेवला नाही. त्याच्या या ढीगभर मिठाची बोली खोत व सावकार कवडीने करीत असे तेव्हा मात्र हा पंचमहाभूतांनाही न घाबरणारा आगरी गलितगात्र होत असे. किती पिकलं आगरात? विचारताच; गर्वानं फर्लागभर हात पसरवणारा तो, किती दाम मिळालं? विचारल्यावर; रिकामा तळहात दाखवत असे.

शेतीवारीन पिकतय त्या पोटन्हेतय,

आगरान पिकतय त्या खोतन्हेतय.

या समाजाची खोत व सावकारांनी अखंड पिळवणूक केली होती, परंतु आपल्या दु:खाचं प्रदर्शन त्यांनी कधी केलं नाही. कुटुंबवत्सल असल्याने आगरी समाज जास्त प्रमाणात विखुरलेला दिसत नाही. असेल त्या परिस्थितीत आनंदानं कसं जगावं हे या समाजाकडून शिकावं. स्वातंत्र्य मिळालं, अनधिकृत सावकारी संपुष्टात आली आणि अधिकृत सरकारी सावकारांनी या समाजाला भूमिहीन करण्याचा सपाटा लावला. मुंबई तर ब्रिटिशांनी गिळंकृत केलीच होती. मुंबईलगतच्या जागांनाही स्वातंत्र्योत्तर काळात महत्त्व प्राप्त झाले होते. सरकारने या मूळनिवासींच्या सोन्यासारख्या वडिलोपार्जित भूमीला लक्ष्य केले. भूसंपादनात अनेक मिठागरे आणि शेती सरकारजमा झाली. मूळनिवासींच्या या मातीत आत्ता परप्रांतीयांची कुटुंबे नांदू लागली आहेत.

कोंडय़ातले मीठ

मिठागरासाठी अनेक एकर जमीन सपाट केली जात असे, तीदेखील कुठल्याही अत्याधुनिक अवजारांशिवाय. तिथे लहान लहान ‘कोंडय़ा’ (चौरस किंवा आयताकृती १-२ फूट उंची असलेले मातीचे बांध बांधून आतील भूभाग सपाट व टणक केलेली जागा) मिळून मिठागरे तयार होत. या कोंडय़ांमध्येच मीठ तयार होत असे. मीठ तयार होण्याची प्रक्रिया नैसर्गिकरीत्या होत असे.

कष्टकऱ्यांचे शोषण

बहुतेक आगर सरकारी जागांवर उभारले होते. त्यामुळे अपार मेहनतीने निर्मिलेल्या या आगरावर समाजाचा हक्कच राहात नसे. कोणीतरी परका आपल्या अक्कलहुशारीने सरकारी अधिकाऱ्यांशी संगनमत करून त्यावर स्वत:चा अधिकार गाजवत असे. कष्टकऱ्यांचे शोषण करत असे. ज्यांना थोडीफार माहिती होती, त्यांनी पुढे स्वत:चे आगर निर्माण केले.

dr.sanjeev.ranjana@gmail.com