बंगळूरु येथून पैसे काढून घेतल्याचे स्पष्ट

बँक खाते हॅक करून फसवणूक केल्याची अनेक प्रकरणे घडत असताना एटीएम कार्डद्वारे रक्कम रातोरात लंपास केल्याचा प्रकार नवी मुंबईत उघडकीस आला आहे. घणसोली येथील वर्षां तुषार गोळे यांच्या इंडसइंड बँकेतील चालू खात्यातील एक लाख रुपये अज्ञात व्यक्तीने रातोरात काढून घेतले आहेत. हे पैसे बंगळूरु येथील एटीएममधून चोरण्यात आल्याची माहिती बँकेने गोळे यांना दिली आहे. रबाळे पोलीस ठाण्यात याबद्दल तक्रार देऊन आठवडा उलटला तरी तपासाला गती आलेली नाही, बँक व्यवस्थापनानेही हात वर केले आहेत.

घणसोली सेक्टर ७ येथे गोळे कुटुंबीय राहतात. वर्षां गोळे यांनी सात वर्षांपूर्वी मोर्या मॅनेजमेंट सव्‍‌र्हिस या नावाने व्यवसाय सुरू केला. त्यासाठी कोपरखैरणे येथील इंडसइंड बँकेत चालू खाते उघडले. गेल्या आठवडय़ात वर्षां गोळे यांच्या वडिलांनी काही रक्कम त्यांच्याकडे आणून दिली. गोळे यांच्या भावाचे १२ मार्च रोजी लग्न असल्याने वडिलांनी आपल्या शेतमालाचे पैसे मुलाच्या लग्नासाठी दिले होते. वडिलांचे पैसे सुरक्षित राहावे यासाठी वर्षां गोळे यांनी ते आपल्या व्यवसायाच्या चालू खात्यात जमा केले.

मोठी रक्कम बचत खात्यात जमा करणे जोखमीचे असल्याने त्यांनी ती रक्कम चालू खात्यात जमा केली. शुक्रवारी रात्री ११ वाजून ५३ मिनिटांनी गोळे यांच्या मोबाइलवर चार लघुसंदेश आले. त्यात दोन वेळा ४० आणि दोनदा १० हजार रुपये एटीएममधून काढण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

हे संदेश पाहून गोळे यांनी रबाळे पोलीस ठाण्यात धाव घेतली. याच काळात त्यांनी बँकेच्या कस्टमर केअर विभागाशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यावेळी ही रक्कम बंगळूरु येथील एटीएममधून काढण्यात आल्याचे सांगण्यात आले.

रबाळे पोलीस ठाण्याच्या डय़ुटी अधिकाऱ्याने गुन्हे रजिस्टर ऐवजी एका कागदावर ही तक्रार नोंदवून घेतली आणि त्या कागदावर पोलीस ठाण्याचा शिक्का मारून गोळे कुटुंबीयांना घरी जाण्यास सांगितले. बँकेकडे विचारणा केली असता तिथूनही योग्य उत्तर मिळत नसल्याचे गोळे यांनी सांगितले.

व्यवसायाचे चालू खाते इंडसइंड बँकेत आहे. गेल्या शुक्रवारी त्यातील एक लाख रुपये लंपास झाले. चौकशी केली असता ते एटीएममधून काढण्यात आल्याचे समजले. एटीएमचा पिन क्रमांक आम्हा पती-पत्नीलाच माहीत आहे. आम्ही दोघेही इथे असताना बंगळूरु येथून पैसे काढण्यात आले आहेत. बँकेने भरपाई देणे गरजेचे आहे, पण ते याबाबत एक शब्दही काढत नाहीत.

वर्षां तुषार गोळे, ग्राहक, इंडसइंड बँक, घणसोली