काम सुरू; ६८ कोटींचा खर्च; मुंबईच्या प्रवेशद्वारावरच होणारी रखडपट्टी संपणार

शीव-पनवेल महामार्गावर दरवर्षी पावसाळ्यात पडणारे खड्डे व त्यामुळे मुंबईच्या प्रवेशद्वारावरच तासन्तास होणारी रखडपट्टी आता संपणार आहे. या महामार्गावर ज्या ठिकाणी डांबरीकरण करण्यात आले आहे तेथे काँक्रीटीकरण होणार असून कामाला सुरुवात झाली आहे. या कामासाठी ६८ कोटींचा खर्च केला जाणार आहे. त्यामुळे खड्डेमुक्त प्रवास अनुभवता येणार आहे. वाहतूक कोंडीतूनही सुटका होणार आहे.

शीव-पनवेल महामार्गावर कळंबोली सर्कल ते मानखुर्द सिग्नल या २२ किलोमीटर रस्त्याचे काम २०१० मध्ये सुरू करण्यात आले होते. परंतु २०१४ मध्ये कामे अपूर्ण असतानाच या रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यामुळे पहिल्या पावसाळ्यातच रस्त्याची दुरवस्था झाली होती. त्यानंतर सातत्याने या महामार्गावर पावसाळ्यात खड्डय़ांमुळे प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. गेली ३ वर्षे ही समस्या असून यामुळे संताप व्यक्त होत होता. खड्डय़ांमुळे दोघा तरुणांना जीव गमवावा लागल्यामुळे मनसेने तुर्भे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोडही केली होती. पावसाळी अधिवेशनात याचे पडसादही उमटले होते. पावसाळ्यानंतर या मार्गाचे काम करण्यात येणार असल्याचे या वेळी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून आश्वासन दिले होते.

तुर्भे व सानपाडा येथील उड्डाणपुलावरही मोठे खड्डे पडल्याने सातत्याने वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे पनवेल ते वाशी टोल नाक्यापर्यंतचे अंतर पार करण्यासाठी दोन तास लागत होते. आता हे काम सुरू झाल्याने यातून मोठा दिलासा मिळणार आहे.

हस्तांतरणाचा चेंडू राज्य सरकारकडे

यामुळे नवी मुंबई महापालिकेला सातत्याने नामुष्कीला सामोरे जावे लागत असल्याने पालिकेने महापालिका हद्दीतील बेलापूर ते वाशी टोलनाक्यापर्यंतचा रस्ता पालिकेला हस्तांतरण करण्याची मागणी केली होती. तसा ठरावही पालिकेत मंजूर करण्यात आला होता. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकतेच न्यायप्रविष्ट बाबींसह रस्ता हस्तांतरण करून देण्याचा प्रस्ताव पालिकेला दिला होता. त्यावर पालिकेने न्यायप्रविष्ट बाबींसह रस्ता हस्तांतरणास विरोध केला आहे. त्यामुळे आता पालिकेकडे पालिका हद्दीतील महामार्ग हस्तांतरणाचा चेंडू राज्य सरकारच्या निर्णयाकडे टोलवण्यात आला आहे.

शीव-पनवेल महामार्गावरील ज्या १५ ठिकाणी डांबरीकरण करण्यात आले होते. त्यामुळे कळंबोली सर्कल ते वाशीपर्यंत ज्या ठिकाणी डांबरीकरण होते तेथे आता काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे पावसाळ्यातही या मार्गावर खड्डे होणार नाही, याची काळजी घेतली जणार आहे.   -किशोर पाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

महामार्गावर बांधकाम विभागमार्फत काँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. कामादरम्यान कोणतीही वाहतुककोंडी होणार नाही. याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.   -सुनील लोखंडे, उपायुक्त वाहतूक विभाग