सिडको वसाहतींतून मालमत्ताकराला तीव्र विरोध

पनवेल : पनवेल महापालिका सिडको वसाहतींत मालमत्ताकर लागू करण्यावर ठाम असल्याने येथील मालमत्ताधारकांडून विरोध वाढला आहे. गेल्या चार वर्षांत पालिकेने घनकचरा व्यवस्थापन वगळून या भागाला कोणत्याही मूलभूत सुविधा दिल्या नाहीत. त्यामुळे सिडकोकडून त्या प्रथम हस्तांतरित करीत या ‘सुविधा पुरवा नंतरच कर आकारणी करा’ अशी भूमिका आता येथील नागरिकांनी घेतली आहे. नागरिकांचा हा विरोध पाहता महाविकास आघाडीने शनिवारी जाहीर सभेचे आयोजन केले आहे. पनवेल पालिकेला चार वर्षं झाल्यानंतर विकासकामांवर मर्यादा येत असल्याने पालिका प्रशासनाने पालिकेत समाविष्ट गावे व सिडकोवसाहतींतील मालमत्ताधारकांना कर आकरणी करण्याचे ठरविले आहे.

त्यानुसार प्रथम पालिकेने समाविष्ट गावांमधील काही गावांना याबाबत नोटिसा पाठवल्या. मात्र या गावांतून तीव्र विरोध झाला. त्यामुळे पालिका प्रशासनाने शासकीय नियमाचा हवाला देत या गावांत पूर्वीप्रमाणेच करआकारणी करण्याचे जाहीर केले असून सिडको वसाहतींत मात्र नवीन करप्रणालीनुसार कर आकारण्याचे ठरवले आहे. यासाठीच्या विशेष नोटीस येथील मालमत्ताधारकांच्या हाती पडू लागल्याने नागरिकांमधून विरोध वाढला आहे.

घनकचरा व्यवस्थापन

वगळता अन्य कोणतीही सुविधा पालिका देत नाही. त्यामुळे ‘आधी मूलभूत सुविधा, मगच कर भरू’ अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे. तर काही नागरिकांनी पहिल्यांदाच भरावा लागणारा हा कर ग्रामपंचायतींच्या अधिनियमाप्रमाणे लागू करावा, भाडेमूल्य मूळ कररचनेत चुकीचे धरले गेल्याने त्यातही बदल करावा,  पहिली पाच वर्षं पालिका संक्रमण अवस्थेत असल्याने पाचवर्षांनंतरच कर लागू करावा अशाही हरकती नागरिकांनी दिल्या आहेत.

पालिकेत समाविष्ट सिडको वसाहतींना आजही पाणीपुरवठा सिडको करत असून गटारे, रस्ते बांधणे व दुरुस्त करण्याची जबाबदारी सिडकोची आहे. अद्याप  सिडको आणि पालिकेत हस्तांतरण झालेले नाही. त्यामुळे ज्या वसाहतींचा ताबा सिडकोकडे आहे, त्याचा कर पालिका कसा वसूल करू शकते असा सवालही येथील मालमत्ताधारक करीत आहेत. सिडकोकडे येथील नागरिक सेवाकर आणि पाणी शुल्क भरत आहेत. त्यामुळे जोपर्यंत पूर्णपणे हस्तांतरण होत नाही, तोपर्यंत पनवेल पालिकेने कोणत्याही प्रकारचा कर घेऊ  नये अशी येथील मालमत्तधारकांची मागणी आहे.

आज जाहीर निषेध सभा

मालमत्ता कराला विरोध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी जाहीर निषेध सभा आयोजित केली आहे. कळंबोली येथील सेक्टर १ मधील सुधागड विद्यालयात सायंकाळी पाच वाजता सभा होणार असून या बैठकीत कळंबोली, कामोठे, खारघर, नवीन पनवेल, तळोजा या सिडको वसाहतींमधील गृहनिर्माण संस्थांचे कराला विरोध करणारे पदाधिकारी एकवटणार आहेत.