संतोष जाधव

ओला व सुका कचरा वर्गीकरण करण्याचे बंधन सोसायटय़ांना घातल्यानंतर पालिकेने आपला मोर्चा शहरातील हॉटेलचालकांकडे वळविला आहे. १०० किलोपेक्षा जास्त ओला कचरा निर्माण होणाऱ्या हॉटेलना त्यावर प्रक्रिया (विघटन) करणे बंधनकारक केले आहे. तसे न केल्यास कचरा उचलणार नाही अशी भूमिका पालिकेने घेतली असून हॉटेलचालकांना तशा नोटिसा पाठविल्या आहेत. याबाबत ‘हॉटेल ओनर्स असोसिएशन’ने नाराजी व्यक्त केली आहे.

घनकचरा व्यवस्थापन नियम एप्रिल २०१६ नुसार तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या काळात ओला व सुका कचरा वर्गीकरण न करणाऱ्या सोसायटय़ांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तेव्हापासूनच मोठय़ा सोसायटीत वर्गीकरण केल्यानंतरच कचरा उचलला जात आहे. यानंतर अनेक सोसायटय़ा सोसायटीच्या आवारातच कचऱ्यावर प्रक्रिया करीत आहेत.

शहरात थ्री स्टार व फाईव्ह स्टार असलेली २२ मोठी हॉटेल्स व इतर मिळून सुमारे ४२५ हॉटेल्स आहेत. त्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात दररोजचा ओला व सुका कचरा निर्माण होतो. ज्या हॉटेलचा ओला कचरा १०० किलोपेक्षा जास्त निर्माण होतो अशी सुमारे शंभर ते सव्वाशे हॉटेल्स आहेत. त्या हॉटेलमालकांनी आपल्या निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी, अशी भूमिका पालिकेने घेतली असल्याचे पालिकेचे मुख्य स्वच्छता अधिकाऱ्यांनी सांगितले.

यासाठी १५ जुलैपासून १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र यानंतरही तशी अंमलबजावणी न झाल्याने आता त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचाही पवित्रा पालिकेने घेतला आहे. त्यामुळे यापुढील काळात हॉटेलची कचराकोंडी होणार आहे. याबाबत हॉटेल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष मारुती भोईर यांनी याबाबत पालिकेने योग्य ते सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

१०० किलोपेक्षा जास्त ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करायला जागाच नाही. सोसायटय़ा यासाठी जागा देणारच नाहीत. त्यामुळे याबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात. आम्ही कर भरत आहोत.

कचरा उचलण्याची जबाबदारी पालिकेचीच आहे. पालिकेनेच कोणत्याही संस्थेकडून कचऱ्यावर प्रक्रिया करावी. त्यासाठी आमच्याकडून ठरावीक रक्कम आकारावी. आम्ही सहकार्य करायला तयार आहोत, असे हॉटेल ओनर्स असोसिएशनचे सचिव महेश शेट्टी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

७२५ ते ७४०

टन शहरातून जमा होणारा कचरा :

३८० ते ४२५

टन  ओला कचरा :

२२५ ते २३५

टन सुका कचरा :

१७० ते २००

टन एकत्रित कचरा :

१२५ ते १५०

टन हॉटेलमधून निर्माण होणारा ओला कचरा :

१०० ते १२५

शंभर किलोपेक्षा जास्त ओला कचरा करणारी हॉटेल

शहरातील हॉटेलांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. १०० किलोपेक्षा जास्त ओला कचरा निर्माण करणाऱ्यांना कचऱ्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक केले आहे. तसे न केल्यास त्यांचा कचरा उचलला जाणार नसून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

-तुषार पवार, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन