नवी मुंबईतील कामोठे येथे भाजपा नगरसेवकाने मनसे कार्यकर्त्यावर हल्ला केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. सोसायटीतील अंतर्गत वादातून ही घटना घडली आहे.

पनवेल महानगर पालिकेतील भाजपा नगरसेवक विजय चिपळेकर यांनी २९ एप्रिल रोजी रात्री १२ च्या सुमारास मनसेचे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. आठ ते दहा कार्यकर्त्यांसोबत स्वतः नगरसेवक विजय चिपळेकर यांनी प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला केला. चिपळेकर आणि त्यांचे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांना मारहाण करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या हल्ल्यानंतर विजय चिपळेकर आणि त्यांचे साथीदार फरार झाले. या हल्ल्यात प्रशांत जाधव गंभीर जखमी झाले आहेत. वैयक्तिक कारण पुढे करत मनसेवर असलेल्या रागा मुळे भाजपा नगरसेवक विजय चिपळेकर यांनी प्रशांत जाधववर जीवघेणा हल्ला केल्याचे सांगितले जाते .२९ एप्रिलला मतदान संपल्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप प्रशांत जाधव यांचे निकटवर्तीय करत आहेत. जाधव यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

कामोठे सेक्टर ७ येथील शुभंकर सोसायटीत ही घटना घडली. या प्रकरणी भाजपा नगरसेवक विजय चिपळेकर याच्यासह अन्य ६ ते ७ लोकांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास सोनवणे यांनी दिली.