बनावटगिरीमुळे र्निजतुकीकरणाबाबत संशय; किमतीही भरमसाठ

विकास महाडिक लोकसत्ता

नवी मुंबई : करोना विषाणूच्या झपाटय़ाने होणाऱ्या प्रसारामुळे अनेक औषध दुकानात हात स्वच्छ करणाऱ्या जंतुनाशकांची मोठय़ा प्रमाणात विक्री होत असून त्याचा काळाबाजार होऊ लागला आहे. दहा रुपयांची एक छोटी बाटली पन्नास ते शंभर रुपयांना विकली जात आहे तर जंतुनाशकाची मोठी बाटली हजार रुपयापर्यंत विकली जात आहे. विशेष म्हणजे यात नकली जंतुनाशकांची विक्री जास्त होऊ लागली आहे.

देशात करोना विषाणूचा शिरकाव झाला असून करोनाची बाधा झालेले शंभर पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात ही संख्या पन्नास पर्यंत पोहचू पहात आहे. करोनाचा सामना करण्यासाठी सातत्याने हात धुणे, तोंडाला रुमाल अथवा मास्क लावणे आणि गर्दीची ठिकाणे टाळणे अशी तीन प्रमुख उपाययोजना सांगितल्या जात आहे. यात घराबाहेर पडलेल्या नागरीकांना सातत्याने साबणाने हात धुणे शक्य नसल्याने हात स्वच्छ करणाऱ्या सॅनिटायझरचा पर्याय निवडण्यात येत आहे. करोना विषाणू मुळे घाबरलेल्या नागरीकांना मोठय़ा प्रमाणात औषध दुकानातून सॅनिटायझर खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुरवठा कमी आणि खूप मोठया प्रमाणातील मागणी यामुळे औषध दुकानातील नामांकित कंपन्याचे चांगले सॅनिटायझर पहिल्या तीन दिवसातच विकले गेले आहेत. त्यामुळे औषध कंपन्यात सध्या आढळणारे हात स्वच्छ करणारे सॅनिटायझर हे स्थानिक पातळीवर तयार करण्यात आलेले विक्रीस ठेवण्यात आलेले आहेत. त्यांचे दरही अवाच्या सव्वा असून एक दहा वीस रुपयांना मिळणारी छोटी सॅनिटायझरची बाटली थेट पन्नास ते शंभर रुपयांना विकली जात आहे.

कमी प्रतीच्या जंतुनाशकांना मागणी

सर्वसाधारपणे बाजारात डेटॉल, त्रीएम, लाईफबॉय, जॉन्सन अ‍ॅन्ड जॉन्सन, हिमालया, गोदरेज यांच्या सारख बोटावर मोजण्या इतके ब्रॅन्डेड सॅनिटायझर विक्रीला असतात. या जंतुनाशकांचा साठा पहिल्या तीन दिवसातच संपलेला आहे. मागणी भरमसाठ आणि पुरवठा कमी यामुळे औषध दुकानात या कंपन्यांचे सॅनिटायझर अस्तित्वात नाही. याचा फायदा भिवंडी, गोवंडी, मानखुर्द, शीव, या भागात घरच्या घरी तयार करण्यात येणारे सॅनिटायझर बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहेत. चांगले जंतुनाशके नसल्याने या कमी प्रतीच्या जंतुनाशकांनाही मोठी मागणी आली आहे.

अल्कोहोलचा वापर

साबणाने हात धुण्याला पर्याय म्हणून जंतुनाशकांचा  वापर केला जातो. करोना विषाणूच्या प्रादुर्भाव सर्वसाधारपणे प्रसिद्ध कंपन्यांची प्रवाशांकडून वापरले जात होते. काही रुग्णालये तसेच मॉल चांगल्या प्रकारच्या स्थानिक उत्पादकालाही प्राधान्य दिले जात होते मात्र मागील आठवडा भरात यात बनावट गिरी व आर्थिक लूटमार मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. जंतुनाशके दोन प्रकारे बनविले जातात. ६० ते ९५ टक्के अल्कोहल वापरुनही जंतुनाशक तयार केले जात असून हे उत्पादन घेणारे स्थानिक उत्पादक आहेत. याशिवाय इॅथिनॉल, इसोप्रोपानाल, आणि एनप्रोपनाल पासूनही सॅनिटायझर तयार केले जात आहेत.

सॅनिटायझरची मागणी खूप वाढली आहे. दिवसाला एक लाख विकले जाणारे सॅनिटायझरची मागणी सध्या पन्नास लाखाची आहे. त्यामुळे ब्रॅन्डेड कंपन्याच्या सॅनिटायझरचा तुटवडा भासू लागला आहे. सॅनिटायझरचा वापर करण्या ऐवजी सरळ साबणाने स्वच्छ हात धुतले तरी चालणारे आहे पण लोकं घाबरुन सॅनिटायझरचा वापर करीत आहेत.

सुनील छाचेड, सचिव, नवी मुंबई केमिस्ट असोशिएशन