दोन दिवसांत साडेतीनशे प्रवाशांना रोखले; वाहनचालकांवर गुन्हे दाखल

नवी मुंबई : देशात टाळेबंदी लागू झाल्यानंतर मुंबई, ठाणे, नवी मुंबईतून गावाकडे स्थलांतर वाढले आहे. इतर सर्वच वाहतूक बंद असल्याने हे लोक अत्यावश्यक सेवेतील वाहनांचा वापर करीत असल्याचे समोर आल्याने आता पोलिसांनी नाकाबंदी कडक करीत सर्वच वाहनांची तपासणी सुरू केली आहे. यात अशी बेकायदा वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. शनिवार आणि रविवारी या दोन दिवसांत ३३९ प्रवाशांनी असे स्थलांतर करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सात वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

करोना विषाणूचा संसर्ग होऊ  नये म्हणून देशात १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी राहणार आहे. या संचारबंदीमुळे हातावर पोट असलेल्या कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याने त्यांनी गावाकडचा रस्ता धरला आहे. जिल्हासीमा बंद करण्यात आल्याने सर्वच प्रकारची प्रवासी वाहतूक बंद आहे. त्यामुळे काहींना थेट पायी प्रवास करीत आपले गाव गाठण्याचे निश्चय केला आहे. तर काहीजणांनी अत्यावश्यक सेवेतील वाहनांचा आधार घेत ते गावाकडे जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून पोलीस कारवाईत हा प्रकार समोर आला आहे. त्या राज्यपालांनीही स्थलांतर थांबविण्याचे आवाहन विभागीय आयुक्तांना केले आहे. त्यामुळे पालिसांनी आता शहरांतील सर्वच रस्त्यांवर नाकाबंदी कडक केली आहे.

वाशी आणि ऐरोली टोल नाका, महापे चेक पोस्ट, कलंबोली सर्कल, जुना मुंबई-पुणे नाका, पळस्पे फाटा आदी ठिकाणी ही नाकाबंदी लावण्यात आली आहे. आतापर्यंत चारशेहून अधिक प्रवाशांना अशी वाहतूक करताना रोखण्यात आले आहे. तर १५ पेक्षा अधिक वाहनचालकांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

शनिवार व रविवारी केलेल्या कारवाईत सात वाहनचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी टोल नाक्यावर सहा वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. यात कुर्ला ते भरुच (गुजरात) ५८ प्रवासी, रे रोड ते उत्तर प्रदेश ४४, शिवडी ते पुणे २९, संताक्रुज ते सिद्धार्थनगर (उत्तर प्रदेश) ५०, बांद्रा ते सोलापूर ६६ असे एकूण २५० प्रवाशी होते. या सर्वाना चेंबूर शेलटर होममध्ये ठेवण्यात आले आहे तर सर्व वाहनचालकांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

शनिवारी रात्री महापे चेकपोस्ट येथे नाशिककडे २६ प्रवाशांना घेऊन जाणारा टेम्पो पकडण्यात आला. यातील प्रवाशांना वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रात ठेवण्यात आले आहे. मोहन चव्हाण या वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पनवेलनजीक पळस्पे फाटा येथेही अशीच कारवाई करण्यात आली आहे. या ठिकाणी एका कंटेनरमधून कर्नाटकला तर मालवाहू ट्रकमधून सातारा येथे जाणाऱ्या ६३ प्रवाशांना अडवण्यात आले. या

प्रकरणी धनराज अवरादे आणि पांडुरंग पवार या दोन वाहनचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात येत असून कृपया सर्वानी प्रशासन आणि सरकारच्या सूचनांचे पालन करावे. कोणही घराबाहेर पडू नये. स्थलांतराचा प्रयत्न केला तरी पोलीस नाकाबंदीत त्यांना पुढे जाऊ देणार नाही.

 पंकज डहाणे, पोलीस उपायुक्त