सिडकोने बांधलेल्या इमारती धोकादायक स्थितीत; वाशीतील घराचे प्लास्टर कोसळले

सिडकोने बांधलेल्या आणि सध्या धोकादायक स्थितीत असलेल्या इमारतींची पडझड नित्याचीच झाली आहे. वाशीतील जेएन-२ मधील घराच्या छताचे प्लास्टर कोसळल्याची घटना शुक्रवारी घडली.

वाशी सेक्टर ९ येथील जेएन-२ मधील जय महाराष्ट्र असोसिएशनच्या इमारतीत राहणाऱ्या रेशमी येरमल यांच्या घराचे प्लास्टर शुक्रवारी सकाळी ९.३० च्या सुमारास कोसळले. जीवितहानी किंवा कोणीही जखमी झाले नसले तरी त्यामुळे सिडकोनिर्मित इमारतींच्या पुनर्बाधणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जेएन-२ प्रकारातील इमारतींत रहिवासी गेली अनेक वर्षे जीव मुठीत घेऊन राहात आहेत. अचानक प्लास्टर कोसळल्यामुळे अन्य रहिवाशांतही भीतीचे वातावरण निर्माण झाले.

दर पावसाळ्यात पालिका धोकादायक इमारतींना नोटीस पाठवते, मात्र त्यानंतर काहीच कारवाई केली जात नाही आणि नंतर थेट पुढच्या पावसाळ्यात पुन्हा या इमारती धोकादायक जाहीर केल्या जातात. ज्या इमारतीचे छत कोसळले तेथील रहिवाशांना पावसाळ्यात अक्षरश: घरात छत्रीचा वापर करावा लागतो. छताचे प्लास्टर तर कोसळत आहेच शिवाय आतील सळ्याही गंजल्या आहेत. काही ठिकाणी सळ्या नाहीशाच झाल्या आहेत. रहिवासी पर्याय नसल्याने जीव मुठीत धरून राहात आहेत.

पालिकेने या इमारती धोकादायक तर घोषित केल्या आहेत, मात्र पुनर्बाधणीसाठी रिकाम्या करून घेतलेल्या नाहीत. राजकीय हस्तक्षेप होत असल्यामुळे या धोकादायक इमारतींचे काहीच होणार नाही. छतांचे प्लास्टर असेच कोसळत राहणार.     – रश्मी येरमल, रहिवासी, वाशी