नवी मुंबई : दोन लाख घरांच्या पहिल्या टप्प्यात जाहीर करण्यात आलेल्या नऊ हजार, तसेच बांधून तयार असलेल्या स्वप्नपूर्ती गृहप्रकल्पातील शिल्लक ८०० घरांसाठी एकूण ८३ हजार ग्राहकांचे अर्ज सिडकोकडे जमा झाले आहेत. मंगळवारी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी ऑनलाइन सोडत प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची मुदत संपत आहे. शेवटच्या दिवशी आणखी सात-आठ हजार ग्राहकांची भर पडून हा आकडा ९० हजारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी १४ हजार घरांसाठी सिडकोकडे एक लाख ८१ हजार मागणी अर्ज आले होते. या सर्व घरांची सोडत २६ नोव्हेंबर रोजी काढली जाणार आहे.

सिडको या परिवहन आधारित गृहप्रकल्पांचा ९५ हजार घरांचा आराखडा तयार आहे. याशिवाय शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या काही जागांवर सिडको आणखी एक लाख दहा हजार घरे बांधण्याच्या तयारीत आहे. अशा दोन लाख दहा हजार घरांचा निर्णय येत्या पाच वर्षांत पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन लाख घरांच्या महागृहनिर्मितीतील पहिला टप्पा नऊ हजार २४९ घरांचा असून त्यांची सप्टेंबरमध्ये ऑनलाइन सोडत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  अर्जाची संख्या एक लाखाच्या वर गेली आहे. मात्र अनामत रक्कम भरून घर आरक्षण करणाऱ्यांची संख्या ही ८३ हजार इतकी आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत मंगळवारी संपत आहे.