नैना क्षेत्रात परवडणाऱ्या घरांच्या उभारणीसाठी विकासकांसह, सिडकोचा पुढाकार

राज्य सरकारच्या वतीने मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदे’च्या पाश्र्वभूमीवर नवी मुंबईत सिडकोने घेतलेल्या ‘परवडणारी घरे आणि ब्लू ईकॉनॉमी परिषदेत’ सुमारे तीन लाख परवडणाऱ्या घरांची निर्मिती होण्याची शक्यता आहे. यात भूमिराज ग्रुपसारखा एकच समूह पनवेल खोपटा येथे दोन लाख परवडणाऱ्या घरांचे गृहसंकुल उभारणार आहे. याशिवाय इतर चार विकासकांनी पन्नास हजार तर सिडकोने ५५ हजार परवडणाऱ्या घरांचे लक्ष्य ठेवले आहे.

मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत १६ लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. यात बांधकाम क्षेत्रातच ३ लाख ८५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. नवी मुंबईच्या दक्षिण भागात विस्र्तीण जमीन शिल्लक असल्याने या भागात मोठय़ा प्रमाणात गृहनिर्मिती होणार आहे. यात परवडणाऱ्या घरांकडे विकासकांचा जास्त कल आहे. या विकासकांना मार्गदर्शन आणि सहकार्य करता यावे, यासाठी सिडकोने मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या पाश्र्वभूमीवर मंगळवारी वाशी येथील सिडकोच्या प्रदर्शन केंद्रात चार परिसंवादांचे आयोजन केले होते. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या उपस्थितीत या परिसंवादाचा शुभांरभ झाला.

नवी मुंबईला अन्यन्यसाधारण भवितव्य असल्याचे सांगून मेहता यांनी हे शहर लोकसंख्या, पायाभूत सुविधा आणि रोजगार निर्मितीतही अग्रेसर राहणार असल्याचे स्पष्ट केले. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी राज्याला लाभलेल्या ७२० किलोमीटरच्या सागरी किनाऱ्यातील १५० किलोमीटरचा भाग कोकणाला मिळाल्याने ब्लू इकॉनॉमीला (सागरी गुतंवणूक) सिडको प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. परवडणाऱ्या घरांसाठी मिळणाऱ्या वाढीव चार एफएसआयचा फायदा घेऊन गृहनिर्मिती सुरू आहे. या जम्बो गृहनिर्मितीत आणखी चार विकासकांनी उडी घेतली असून १०-१५ हजार परवडणारी घरे पनवेल परिसरात उभारली जाणार आहेत.

भूमिराज समूहाचा प्रकल्प सर्वात मोठा असून एकाच संकुलात दोन लाख घरे बांधली जाणार आहेत. सिडकोने गेल्या ४६ वर्षांत केवळ १ लाख ३० हजार घरे बांधली आहेत ५५० एकर जमिनीवर हा समूह महागृहनिर्मिती करणार आहे. येत्या पाच वर्षांत तळोजा, खारघर भागांत ५५ हजार घरे बांधणार असल्याचे, सिडकोने जाहीर केले आहे. या क्षेत्रात तीन लाखांपेक्षा जास्त घरांची निर्माण होणार असल्याने घरांचे दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.