सिडकोने एकाच दिवसात आपल्या दक्षिण क्षेत्र स्मार्ट सिटी योजनेत ३४ उद्याने व मैदानांच्या उद्घाटन सोमवारी होत आहे. रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी व्यस्त कार्यक्रमामुळे येण्यास नकार दिला असला तरी ही उद्घाटने स्थानिक खासदार व आमदारांच्या उपस्थितीत उरकून घेतली जाणार आहेत. एकाच वेळी ३४ उद्याने व मैदानांचे उद्घाटन होण्याची ही राज्यातील बहुधा पहिलीच वेळ आहे.
यात नवी मुंबई पालिका केंद्र व राज्य सरकारच्या आर्थिक मदतीवर स्मार्ट उपाययोजना करणार आहे, तर सिडको स्वखर्चाने खारघर, पनवेल भागांतील सात उपनगरांची मिळून एक दक्षिण क्षेत्र स्मार्ट सिटी उभारणार आहे. सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या या स्मार्ट सिटीसाठी ३४ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून काही स्थापत्यकामांना सुरुवातदेखील करण्यात आली आहे. त्यात या ३४ उद्याने व मैदानांचा समावेश आहे. या कामांचे आदेश देण्यात आले असून सोमवारपासून या उद्याने व मैदानांना संरक्षित भिंत घातली जाणार असून वृक्षारोपण केले जाणार आहे. सिडकोच्या या कार्यक्षेत्रात सध्या ५७ उद्याने व मैदाने आहेत.
खारघरमध्ये आर्थिक केंद्र उभारणार
मुंबईतील बांद्रा-कुर्ला व्यापारी संकुलाच्या धर्तीवर सिडको खारघर येथील सेंट्रल पार्कजवळ एक अद्ययावत व आधुनिक असे आर्थिक केंद्र उभारणार असून त्याच्या चाचपणीला सुरुवात झाली आहे. सेंट्रल पार्कच्या ८० हेक्टर जमिनीजवळ आणखी जवळपास ४० हेक्टर जमीन मोकळी आहे. सिडको या जमिनीवर वित्तपुरवठा करणाऱ्या संस्था, बँका यांना सामावून घेणारे आर्थिक केंद्र उभारणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखविल्याची माहिती भाटिया यांनी दिली.