वाशी स्थानकात वॉटर व्हेंडिंग मशीन; प्रवाशांचा वाढता प्रतिसाद

वाशी रेल्वेस्थानकात प्रवाशांना आता प्रवासादरम्यान महागडे बाटलीबंद विकत घेण्याची वेळ येणार नाही. बाटलीबंद पाण्याइतकेच शुद्ध पाणी प्रवाशांना किफायतशीर दरात मिळणार आहे. यासाठी वाशी स्थानकात ‘वॉटर व्हेंडिंग मशीन’ बसविण्यात आल्या आहेत.

जलशुद्धीकरण करणाऱ्या ‘वॉटर व्हेंडिंग मशीन’च्या माध्यमातून प्रवाशांना शुद्ध पाणी दिले जात जाईल. या आधुनिक पाणपोईला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे, असे स्थानक व्यवस्थापक सुरेश खुराना यांनी सांगितले.

रेल्वे प्रवाशांसाठी पिण्यायोग्य पाण्याच्या उपलब्धतेत आणखी सुधारणा करण्याच्या दृष्टीने, देशभरातील रेल्वे स्थानकांवर पिण्याचे पाणी उपलब्ध करणारी वॉटर वेंडिंग मशीन्स( डब्लूव्हीएम) बसवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने सर्वसमावेशक धोरण तयार केले आहे. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या इच्छेनुसार पिण्याचे पाणी देणाऱ्या यंत्रांच्या माध्यमातून किफायतशीर दरात निर्धारित दर्जाचे पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करण्याच्या हेतूने नवी मुंबईतील पहिल्या स्थानकांवर म्हणजे वाशी येथे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने नवी मुंबईतील इतर स्थानकांवर बसविण्यात येणार आहे.

अत्यंत उच्च दर्जाचे तंत्रज्ञान असलेल्या या यंत्रांमधून प्रवाशांना दोन रुपयाला २०० मिली तर पाच रुपयांना एक लिटर अशा माफक दरात शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. बाटलीबंद पाण्याच्या तुलनेत डब्लूव्हीएममधून मिळणारे पिण्याचे शुद्ध पाणी खूपच कमी दरात उपलब्ध होत आहे अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.

शुद्धिकरणाच्या नऊ प्रक्रिया

‘वॉटर व्हेंडिंग मशीन’मध्ये प्रिसिजन गाळणी, कार्बन गाळणी, ‘आरवो’ शुद्धीकरण, मिनरलायझेशन, ‘यूव्ही’ स्टॅबिलायझेशन, ओझॉन स्टरलायझेशन यासारख्या नऊ  प्रक्रियांतून पाणी शुद्ध केले जाते. जलशुद्धीकरणाची ही प्रक्रिया बाटलीबंद पाण्यासारखीच आहे. पाण्यातील जड धातू, जीवाणू या प्रकियांदरम्यान नष्ट होत असल्याने प्रवाशांना बाटलीबंद पाण्याइतकेच शुद्ध पाणी मिळते.