News Flash

लिपिकांच्या कामांचा शिक्षकांवर भार

लिपिक नेमावेत, अशी लेखी मागणी माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी आयुक्तांकडे केली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

नवी मुंबई महापालिकेच्या १८ माध्यमिक शाळांपैकी फक्त तीन शाळांमध्येच लिपिकांची नेमणूक करण्यात आली असून उर्वरित १५ शाळांत शिक्षक व मुख्याध्यापकांनाच लिपिकांची कामे करावी लागत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. लिपिक नेमावेत, अशी लेखी मागणी माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी आयुक्तांकडे केली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक व प्राथमिक शाळा आणि बालवाडय़ा आहेत. मागील अनेक वर्षांपासून या शाळांचा दहावीचा निकाल खासगी शाळांच्या तुलनेत अतिशय चांगला, म्हणजे सरासरी ९० टक्कय़ांपर्यंत लागत आहे. या यशात शिक्षक व मुख्याध्यापकांची भूमिका महत्त्वाची ठरत असताना १८ शाळांपैकी फक्त दोन शळांत कागदोपत्री मुख्याध्यापकांची नेमणूक करण्यात आली आहे. उर्वरित शाळांत मुख्याध्यापकाचे काम करणाऱ्या शिक्षकांना पदोन्नतीही देण्यात आलेली नाही आणि त्या पदाचे वेतनही देण्यात येत नाही. त्यातच लिपिकांचीही नियुक्ती करण्यात न आल्याने शिक्षकांवर अध्यापनेतर कामांचाही भार पडत आहे.

करावे, दिघा, श्रमिकनगर, महापे, घणसोली, कोपरखैरणे, खैरणे, तुर्भे स्टोअर, तुर्भे गाव, वाशी, सानपाडा, दिवाळे, शिरवणे नेरुळ, ऐरोली व कातकरीपाडा येथे महापालिकेच्या माध्यमिक विभागाच्या शाळा आहेत. त्यात नववी व दहावीचे वर्गही भरतात. या शाळांमध्ये सरल प्रणाली, दहावीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन भरणे, ११वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती, एसडीएमआयएस प्रक्रियेतील ४४ कॉलममध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांची माहिती भरणे, ईआरपी प्रक्रिया अशी विविध कामे करण्यासाठी लिपिक असणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात केवळ नेरुळ, ऐरोली, कातकरीपाडा येथील शाळांतच लिपिकाची नेमणूक करण्यात आली आहे. उर्वरित शाळांमध्ये लिपिकच नसल्यामुळे शिक्षक आणि मुख्याध्यापकांनाच ही कामे करावी लागत आहेत. याचा परिणाम अध्यापनावर, शाळांच्या निकालावर आणि पर्यायाने विद्यार्थ्यांच्या भविष्यावर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांनी लिपिकांच्या नेमणुकीसाठी आयुक्तांशी पत्रव्यवहार केला आहे. त्याबाबत योग्य तो विचार करण्यात येईल. लिपिक नेमणुकीबाबतचा प्रश्न विचाराधीन आहे.

-संदीप संगवे,

शिक्षणाधिकारी, नवी मुंबई महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2018 2:55 am

Web Title: clerical work loads on teachers
Next Stories
1 अंतर्गत वाहतुकीसाठी ट्रामचा पर्याय?
2 प्रवाशांचा पाय खोलात
3 पर्यावरणस्नेही संकुल
Just Now!
X