तात्पुरत्या डागडुजीसाठी रेतीऐवजी बांधकाम कचरा वापरला जात असल्याचे उघड

( शेखर हंप्रस )नवी मुंबई नवी मुंबई पालिका क्षेत्रात रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी सिमेंट किंवा डांबराचा वापर करण्याऐवजी डेब्रिज वापरण्याची शक्कल लढवण्यात आली आहे, मात्र त्यामुळे खड्डे वारंवार पडत असून पादचारी आणि प्रवाशांची गैरसोय होत आहे. पावसाळ्यात तात्पुरत्या दुरुस्तीच्या नावाखाली सर्रास राडारोडा टाकला जात आहे. कोपरखैरणे सेक्टर १९ ए आणि १९ सीला जोडणाऱ्या रस्त्याची अशा प्रकारे डागडुजी करण्यात आली आहे. सुमारे २० फुटांचा हा रस्ता कधीच पूर्णपणे दुरुस्त केला जात नाही, अशी तेथील रहिवाशांची तक्रार आहे.

पावसाळा सुरू झाला की रस्त्यावर खास करून नोडअंतर्गत असलेल्या डांबरी रस्त्यावर खड्डे पडतात. ऐन पावसात हे खड्डे बुजवणे शक्य नसल्याने त्यात खडी टाकली जाते, मात्र यंदा कोपरखैरणे येथे अशा रस्त्यावर खडीऐवजी राडारोडय़ाच्या गोण्या रिकाम्या केल्या जात आहेत. पालिकेच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना याची सुतराम कल्पना नसल्याचे समोर आले आहे. निविदा काढली नसेल, देयक संमत झाले नसेल, त्यामुळे तात्पुरते असे काम केले असेल, अशी उत्तरे अधिकारी देत आहेत. मात्र रस्ते बांधणी करताना देखभाल दुरुस्तीचा उल्लेख सर्वच निविदांत केला जात असताना याच ठिकाणी असे का घडत आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या विषयी राडारोडा टाकणाऱ्या कामगारास विचारले असता, ‘लोकांनी रस्त्याच्या कडेला गुपचूप टाकलेल्या राडारोडय़ाच्या गोण्या आम्ही उचलतो आणि साहेबांनी सांगितलेल्या ठिकाणी नेऊन टाकतो. रोज असे अनेक ठिकाणी करतो, मात्र आम्ही इथले नसल्याने कुठे डेब्रिज टाकले त्या विभागाचे नाव आम्ही सांगू शकत नाही,’ असे उत्तर त्याने दिले. मात्र हे ‘साहेब’ कंत्राटदार पर्यवेक्षक की पालिका अधिकारी हे मात्र माहिती नसल्याचे त्याने सांगितले.

खड्डे बुजवण्यासाठी दर वर्षी येथे राडारोडाच टाकला जातो. विटांच्या तुकडय़ांवरून तोल जाऊन अनेक दुचाकीस्वार पडतात. हा रस्ता दुरुस्त का केला जात नाही, याचे गूढ कंत्राटदर आणि पालिका अधिकारीच उलगडू शकतात.

– राजेश पाटील, रहिवासी

खड्डय़ांत राडारोडा टाकणे अयोग्य आहे. चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. नियमाप्रमाणे जे साहित्य वापरणे योग्य आहे तेच साहित्य वापरून खड्डे बुजवण्याच्या सूचना दिल्या जातील.

– मोहन डगावकर, शहर अभियंता