नवी मुंबई : शासनाच्या निर्देशानुसार १८ वर्षांवरील नागरिकांच्या करोना लसीकरणाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी महानगरपालिकेच्या २७ लसीकरण केंद्रांवर १८ वर्षांवरील ३४४९ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करोना लसीकरणाला गती मिळावी याकरिता लसीकरण केंद्रांमध्ये वाढ करण्यात आलेली असून सध्या ५९ लसीकरण केंद्रे सुरू आहेत. त्यामधील वाशी, नेरूळ, ऐरोली येथील सार्वजनिक रुग्णालये, तुर्भे माता बाल रुग्णालय, सेक्टर ५ वाशी येथील आएसआयएस रुग्णालयामधील जम्बो लसीकरण केंद्र तसेच २३ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रे अशा २७ ठिकाणी १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती. आत्तापर्यंत ५ लाखाहून अधिक नागरिकांनी करोना लसीचा पहिला डोस घेतला आहे.