आठवडाभरात ६५८ नवे रुग्ण; चढउतार होत असल्याने प्रशासनही चिंतेत

नवी मुंबई : करोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर नागरिकांची मुक्तसंचार वाढत करोनाची दुसरी लाट प्रचंड वेगाने पसरली होती. आताही शहरात गर्दीच्या ठिकाणी मुक्तसंचार वाढू लागल्याने रुग्णवाढीचा धोका कायम आहे. रविवारी एकाच दिवसात शहरात १३५ रुग्ण सापडले असून आठवडाभरातील रुग्णांची संख्या ही ६५८ पर्यंत पोहचली आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका प्रशासनाने वर्तवला आहे.

नवी मुंबई करोनाच्या दुसऱ्या लाटेत उपचाराधीन रुग्णांची संख्या १२ हजारांपर्यंत गेली होती तर दैनंदिन रुग्णांची संख्या १४०० पर्यंत गेली होती. शासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधांनंतर ही परिस्थिीती आटोक्यात आली होती. त्यामुळे शहरातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एक हजारापर्यंत खाली येत दैनंदिन रुग्णांची संख्याही ५० ते ६० च्या घरात स्थिरावली होती. यामुळे शहरातील निर्बंध उठविण्यात आले होते. निर्बंध उठविल्यानंतर काही दिवस दैनंदिन रुग्ण स्थिर होते. मात्र शहरात मुक्तसंचार वाढल्याने रुग्णवाढ होताना दिसत आहे. १७ जूनला ३ हजार ७०० करोना चाचण्या करण्यात आल्या होत्या यात १११ रुग्ण सापडले होते. तर १८ जूनला ४ हजार ६०० चाचण्या करण्यात आल्यानंतर ९३ रुग्ण सपाडले होते. १९ जूनला दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत ती ३१ पर्यंत खाली आली होती. मात्र २० जून रोजी दैनंदिन रुग्णांत वाढ होत १३५ रुग्ण सापडले आहेत. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

निर्बंध उठविण्यात आल्यानंतर शहरात कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येही सामाजिक अंतराचे तीन तेरा वाजल्याचे चित्र आहे तर दुकाने, भाजी मार्केट, मॉल या ठिकाणीही भरमसाट गर्दी होताना दिसत आहे. शनिवारी व रविवारी मॉल तसेच बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहेत. करोनाच्या दोन लाटा अनुभवल्यानंतरही नागरिकांच्या हनुवटीखालीच मुखपट्टी दिसत आहे. त्यामुळे शहरात करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका प्रशासनाने वर्तवला आहे. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी रुग्णवाढ कायम राहिल्यास निर्बंध लागू करावे लागतील असा इशारा दिला आहे.

मॉलमध्ये १७ बाधित

नवी मुंबईतील चारही मोठ्या मॉलमध्ये गेल्या तीन दिवसांत १२२५३ प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या असून यात १७ जण करोनाबाधित आढळले आहेत. तर ५० जण संशयित आहेत. नागरिक संशयित असूनही घराबाहेर पडत आहेत, हा शहरासाठी मोठा धोका आहे. लक्षणे असताना घराबाहेर न पडता विलगीकरण करून घेणे गरजेचे आहे.

लहान मुलेही घराबाहेर

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका वर्तवला जात आहे.

शहरात रुग्णवाढ कमी झाली असली तरी लहान मुले बाधित होण्याचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. असे असतानाही बाजारपेठा, मॉल किंवा फेरफटका मारताना नागरिक लहान मुलांना घेऊन जात आहेत. त्यात काहीजण त्यांची सुरक्षाही पाळताना दिसत नाहीत, हे चुकीचे असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

शहरात बहुतांश व्यवहार शासनाच्या निर्देशानुसार नियमानुसार सुरू झाले आहेत. परंतु नागरिकांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होत आहे. बेफिकिरीमुळे  तिसऱ्या लाटेला आपण आमंत्रण देत आहोत. करोनाचा धोका अद्याप संपला नसून तिसऱ्या लाटेचा धोका अधिक मोठा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नियमांचे पालन करा. -अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका