20 January 2019

News Flash

खारघर कॉर्पोरेट पार्कच्या कामाला यंदा सुरुवात

सिडकोने सरकारकडे तीन वाढीव चटई निर्देशांक मागितला आहे. 

यंदा डिसेंबर अखेपर्यंत धावणारी नवी मुंबई मेट्रो, नेरुळ-उरण रेल्वेमार्गाचे अंतिम टप्प्यात असलेले काम आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला आलेली गती, यामुळे सिडकोने चौथा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या (बीकेसी) धर्तीवर खारघर येथे १२० हेक्टर जमिनीवर खारघर कॉर्पोरेट पार्क (केपीसी) उभारण्यास यंदा सुरुवात होणार आहे. यासाठी जगातील सात वास्तुविशारदांनी आपले आराखडे सिडकोला सादर केले आहेत. त्यातील एकाचा आराखडा महिन्यात स्वीकारला जाणार आहे. हे पार्क बीकेसीपेक्षा वेगळे व्हावे यासाठी सिडकोने सरकारकडे तीन वाढीव चटई निर्देशांक मागितला आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने २० वर्षांपूर्वी वांद्रे-कुर्ला उपनगरामधील जमिनीवर भराव टाकून अडीच एफएसआयने बीकेसीची उभारणी केली. अत्यंत नियोजनबद्ध, प्रशस्त आणि सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याने या ठिकाणी अनेक आंतरराष्ट्रीय वित्तपुरवठा करणाऱ्या संस्था, बँका, बहुउद्देशीय बडय़ा कंपन्या, कॉर्पोरेट जगत कंपन्यांनी कार्यालये थाटली आहेत. त्याच धर्तीवर पण बीकेसीत राहिलेल्या उणिवांचा अभ्यास करून सिडको खारघर व सेंट्रल पार्क दरम्यानच्या पारसिक डोंगररांगेच्या पायथ्याशी असलेल्या १२० हेक्टर मोकळ्या जमिनीवर खारघर कॉर्पोरेट पार्क उभारणार आहे. त्यासाठी सहा महिन्यांपूर्वी जागतिक पातळीवरील वास्तुविशारदांकडून आराखडे मागविण्यात आलेले आहेत. अमेरिका, इंग्लड, नेदरलॅन्ड, सिंगापूर अशा २४ देशांतून आलेल्या या सात आराखडय़ांचे परीक्षण पाच निष्णात अधिकाऱ्यांच्या समितीने केले असून त्यातील एक आराखडा या पार्कसाठी निश्चित केला जाणार आहे.  राज्य सरकारने या प्रकल्पासाठी तीन एफएसआय दिल्यानंतर उभ्या राहणाऱ्या टोलेजंग इमारती हे या पार्कचे आकर्षण ठरणार आहे. त्या शहरातील सर्वात उंच इमारती ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जगातील वास्तुविशारदांना पसंत पडेल असा आराखडा घेऊन या संपूर्ण पार्कच्या बांधकामाची जबाबदारी सिडको स्वीकारणार आहे. पुढील महिन्यात सातपैकी एका डिझाइनरच्या कलाकृतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. संचालक मंडळाच्या मंजुरीनंतर प्रकल्पाला सुरुवात केली जाईल. राज्य सरकारने या प्रकल्पाला तीन एफएसआय दिल्यानंतरही आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी उंच इमारतींना येणारी मर्यादा या प्रकल्पात अडथळा ठरण्याची शक्यता आहे.

विमानतळ, मेट्रो, गोल्फ कोर्स, पनवेल टर्मिनस या परिसरात एखादे कॉर्पोरेट पार्क उभारावे असा निर्णय सिडकोने गेल्या वर्षीच घेतला आहे. त्यासाठी जागतिक वास्तुविशारदांकडून आराखडे मागविण्यात आले आहेत. त्यातील एका आराखडय़ाला मान्यता दिली जाणार आहे. हे पार्क बीकेसीपेक्षा चांगले व्हावे यासाठी सिडकोचे प्रयत्न सुरू असून यंदा या कामाला चालना मिळणार आहे.  – भूषण गगराणी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको 

First Published on January 2, 2018 12:10 am

Web Title: corporate park work project start in navi mumbai