शोध मोहिम सुरूच; पुलावरून पाणी वाहत असतानाही प्रवास

पनवेल : पनवेल तालुक्यातील उमरोली गावाच्या प्रवेशद्वारावरील पुलावरून अडीच फूट पाण्याचा लोंढा जात असताना दुचाकीवरून जाणारे दाम्पत्य वाहून गेले. ही घटना मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता घडली. दाम्पत्य बुडताना पाहून उमरोली गावच्या तरुणांनी गाढी नदीपात्रात उडय़ा घेतल्या मात्र पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने बचावाचे प्रयत्न तोकडे ठरले. अग्निशमन दलाने उमरोली ते शांतीवन या परिसरात गाडी नदीपात्रात शोधमोहीम हाती घेतली, मात्र सायंकाळपर्यंत या दोघांचा शोध लागला नाही.

आदित्य व सारिका आमरे अशी बुडालेल्या दाम्पत्याचे नावे आहेत. हे दोघेही ‘ज्वेल निर्मिती गार्डन’ या इमारतीमध्ये राहत होते.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून पावसाचे प्रमाण अधिक असले की गाढी नदीपात्राच्या काठी वसलेल्या पनवेल तालुक्यातील उमरोली गावाचा संपर्क तुटतो. मात्र या परिसरात मागील पाच वर्षांपासून नवीन इमारतींमध्ये राहण्यासाठी आलेल्या रहिवाशांना पावसाळ्यात नदीपात्र तुडुंब झाले तरी कामावर जाण्यासाठी धोकादायक नदीपात्र ओलांडून जावे लागते. मंगळवारी आमरे दाम्पत्याने पाणी असताना दुचाकी घातली आणि ही दुर्घटना घडली.

यापूर्वी नेरुळ येथे राहणारे आमरे दाम्पत्याने काही महिन्यांपूर्वीच उमरोली येथील ‘सनफ्लावर’ या इमारतीमध्ये घर खरेदी केले होते. याच घराचे काम सुरू असल्याने ते ‘ज्वेल निर्मिती गार्डन’ या इमारतीमध्ये राहत होते. मंगळवारी सकाळी गावाच्या प्रवेशद्वारावरील पुलावरून पाणी जात असल्याने अनेक ग्रामस्थ पाण्याची पातळी कधी कमी होईल या प्रतीक्षेत होते. आमरे कुटुंबीयही प्रतीक्षेत होते. अनेक जण पूल ओलांडण्यासाठी पायी चाचपडत जात होते. एका दुचाकीचलकाने हा पूल पार केल्यानंतर आमरे दाम्पत्याने पाण्याच्या प्रवाहातून दुचाकी काढण्याचा निर्णय घेतला. अनेक ग्रामस्थांनी दुचाकीवरून जाणे धोक्याचे होईल, असा इशारा दिल्यानंतरही त्यांनी दुचाकी तेथून नेत असताना पाण्याच्या ओढय़ात ते वाहून गेले. बुडाल्यानंतर  सारिका या पाण्यावर काही वेळा बाहेर येण्यासाठी संघर्ष करत होत्या. आणि पतीला वाचविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. मात्र त्यांचे हे प्रयत्न तोकडे ठरले. दोघांनाही बुडताना पाहिल्यानंतर प्रत्यक्षदर्शीनी त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उडय़ा मारल्या, मात्र पाण्याच्या प्रवाहामुळे ते तिथपर्यंत पोहचू शकले नाही. पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने डोळ्यासमोर आमरे दाम्पत्य वाहून गेले, तरी आम्ही काही करू शकलो नाही, अशी खंत व्यक्त केली. अग्निशमन दल व महसूल विभागाने उमरोली ते शांतीवन या परिसरात गाडी नदीपात्रात शोधमोहीम हाती घेतली, मात्र सायंकाळपर्यंत या दोघांचा शोध लागला नाही.

पुलाचे काम झाले असते तर दुर्घटना टळली असती

उमरोली गावाचा पूल हा प्रत्येक पावसाळ्यात पाण्याखाली जात असल्याने याच पुलाशेजारी नवीन पूल बांधण्यासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा खर्च सार्वजनिक बांधकाम विभाग करत आहे. मार्च महिन्यात या पुलाच्या बांधकामाचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला होता. मात्र काम सुरू झाले नाही. सरकारच्या संथगतीच्या कारभारामुळे येथील नागरिकांनी मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणाने चालणाऱ्या कामाविषयी संताप व्यक्त केला.  पावसाळ्यापूर्वी या नवीन पुलाचे बांधकाम झाले असते तर ही घटना घडली नसती, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कॉंग्रेस पक्षाचे पनवेलचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम विलंबाने का सुरू केले. प्रस्तावाला व प्रत्यक्षातील कामाला विलंब झाल्याने अधिकाऱ्यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पुलावर पथदिवे

दुर्घटनेनंतर  शेजारच्यांनी थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जात पूलावर पथदिवे लावण्याची मागणी केली. मात्र अधिकाऱ्यांनी हा रस्ता जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असल्यामुळे यावरील दुरुस्ती व देखभाल ही जबाबदारी जिल्हा परिषद प्रशासनाची असल्याचे सांगितले. याबाबत पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी धोंडू गुरे यांनी, संबंधित पुलावर तात्पुरत्या स्वरूपात दोन दिवसांच्या आत विजेचे पथदिवे उभारू असे आश्वासन दिले आहे.