रात्रीच्या संचारबंदीचा प्रस्ताव

नवी मुंबई</strong> : नवी मुंबईतील करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असून कोणतीही लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहे. हे रुग्ण सर्रास बाहेर फिरत असून वाढत्या संर्सगाचे प्रसारक ठरत आहेत. त्यामुळे पालिकेची चिंता वाढली आहे. पुढील महिन्यात ही संख्या दुहेरी उत्परिवर्तन (डबल म्युटेशन) मुळे वाढण्याची शक्यता आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. त्यासाठी पालिका प्रशासन मर्यादीत संख्या असताना कडक निर्बधांचा प्रस्ताव तयार करीत असून रात्रीची संचारबंदी हा एक उपाय लवकरच केला जाणार आहे.

नवी मुंबईत गेल्या वर्षी निर्माण झालेल्या आरोग्य स्थितीची पुनरावृत्ती होत आहे. या महिन्यात गेल्या वर्षी पाचशे रुग्णसंख्या होती ती आता सातशेपर्यंत गेली आहे. यात कोणत्याही प्रकाराची लक्षणे नसताना तपासणी केल्यानंतर करोनाबाधित असल्याचा अहवाल येत आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यावाचून पर्याय नाही.  केंद्रीय आरोग्य मंत्रालय व जागतिक आरोग्य संघटनेने करोनाच्या लक्षणांची यादी प्रसिध्द केली आहे. त्यानुसार लक्षणे आढळून आल्यास तत्काळ तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हवामान बदलामुळे साधी शिंक आली तरी करोना चाचणी करुन घेतली जात आहे. पालिकेने प्रतिजन तपासणीची संख्या वाढवली असून गर्दीच्या ठिकाणीही केंद्र उभारली आहेत. त्यामुळे नवी मुंबईत सर्वाधिक तपासणी केली जात असून संर्पकात आलेल्या वीस ते तीस लोकांपर्यंत ही तपासणी केली जात आहेत. मात्र कोणत्याही प्रकारची लक्षणे नसलेले ४७६ रुग्ण वाशी येथील पालिकेच्या काळजी केंद्रात उपचार घेत आहेत तर २९५ रुग्णांमध्ये लक्षणे आढळून आल्याने त्यांच्यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ठरवून दिलेले  कोविड रुग्णांसाठीचे सर्व प्रकारचे उपचार केले जात आहेत. अत्यवस्थ रुग्णाला नेरुळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात हलविले जात आहे. या एकूण १००१ रुग्णांपैकी सौम्य लक्षणे असलेल्या २३० रुग्णांना गोळ्या व प्रतिजैविके देऊन उपचार केले जात आहेत. या दोन्ही प्रकारापेक्षा कोणताही लक्षणे नसलेले करोना बाधित रुग्णांची संख्या ४७६ असल्याचे वाशी कोविड काळजी केंद्राचे प्रमुख डॉक्टर वसंत माने यांनी सांगितले. कोणतीही लक्षणे नसल्याने मला काहीही झालेले नाही या गैरसमजुतीत असलेल्या या रुग्णांनी संर्सग प्रसाराला हातभार लावला असून यामुळे शहरातील रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे.

लस घेतलेल्यांनाही धोका

राज्यात फेब्रुवारी महिन्यात करोनाची दुसरी लाट पसरु लागली असून त्याला नवी मुंबई अपवाद नाही. गेल्या वर्षी पेक्षा झपाटय़ाने रुग्णसंख्या वाढत असल्याने हे दुसरे उत्परिवर्तन असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. करोनाच्या गुणसूत्रामध्ये बदल झाल्याने हा रोगाची लक्षणे दिसून येत नसल्याचे आरोग्य विभागातील डॉक्टरांचे मत आहे. त्यामुळे मुखपट्टी, आरोग्य अंतर, आणि स्वच्छता ही तीन सूत्र वापरण्याशिवाय पर्याय नाही. विशेष म्हणजे या दुसऱ्या उत्परिवर्तन (म्युटेशन) मुळे करोनाची लस घेतलेल्या नागरिकांनाही पुन्हा करोना गाठत आहे.

नवी मुंबईत करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याने चिंता वाढू लागली आहे. नवी मुंबईकर अद्याप फारसे गंभीर नसल्याचे मुखपट्टी वापरत नसल्याचे दंडांच्या रकमेवरून दिसून येत आहे. दंडातून रक्कम जमा करणे हा पालिकेचा हेतू नाही, पण नागरिक अद्याप या साथीचे गांभीर्य का घेत नाही हे कळत नाही. त्यामुळे येत्या काळात काही अप्रिय निर्णय घ्यावे लागतील.

अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुबंई पालिका