करोनाचे दररोजचे रुग्णही नव्वदपर्यंत

नवी मुंबई : जानेवारीअखेपर्यंत दररोजच्या करोना रुग्णांची संख्या ५० पर्यंत घटल्याने मोठा दिलासा मिळाला होता. मात्र १ फेब्रुवारीपासून करोना रुग्णांत पुन्हा वाढ होत असून ही संख्या ९० पर्यंत जात आहे. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांतही वाढ झाल्याने  चिंता व्यक्त होत आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

राज्यात गेले काही दिवस करोना रुग्णसंख्या घटली होती. यातूनच सर्वसामान्यांसाठी प्रवास खुला करण्यात आला. बंधने अधिक शिथिल करण्याची प्रक्रि या सुरू झाली; परंतु या आठवडय़ात रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. नवी मुंबईतही नव्या रुग्णांची संख्या ३७ पर्यंत कमी झाली होती ती आता परत दररोज ८० ते ९० रुग्णांपर्यंत जात आहे. त्यामुळे सातशेपर्यंत खाली आलेली उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही वाढ होत ती ८२५ पर्यंत गेली आहे. पालिका आयुक्तांनी आरोग्य विभागाला वाढती रुग्णसंख्या पाहता सतर्क केले असून जास्तीत जास्त करोना चाचण्या करण्याचे आदेश दिले आहेत. रुग्ण वाढले तरी चालेल पण लवकर निदान करून तात्काळ उपचारकडे लक्ष केंद्रित केल्याचे प्रशासनाने  सांगितले आहे.

उपनगरीय रेल्व सेवा सुरू झाल्यानंतर शहरातील नवे रुग्ण व उपचाराधीन रुग्ण वाढत असल्याने पालिका प्रशासनाने रेल्वे स्थानकांवर उभारलेल्या चाचणी केंद्रात जास्तीत जास्त करोना चाचण्या करण्याचे नियोजन केले असून पालिका प्रशासन लक्ष ठेवून असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी सांगितले.

मृतांची संख्या १०९९

करोनामुळे गुरुवा्ररी एक जणाचा मृत्यू झाला असून आतापर्यंत मृतांची संख्या ही १०९९ इतकी झाली आहे. मृतांमध्ये ५० वयोगटावरील रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे शहरातील ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

७१ नवे करोनाबाधित

नवी मुंबईत गुरुवारी ७१  नवे करोनाबाधित आढळले असून एक जणांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईतील शहरातील करोनाबाधितांची संख्या  ५३,७२७  इतकी झाली आहे.

शहरात करोनामुक्तीचा दर ९७ टक्के  असून एकूण ५१,७८७ जण करोनामुक्त झाले आहेत.

शहरातील करोनावर पालिकेने योग्य प्रकारे नियंत्रण मिळवले असले तरी करोनास्थितीवर बारकाईने लक्ष आहे. वाढत्या  करोना रुग्णांच्या आकडेवारीवरही लक्ष असून रुग्ण वाढू नये याबाबत खबरदारी घेत आहोत. नागरिकांनीही योग्य ती खबरदारी घेऊन सहकार्य करावे.

-अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका 

आठवडाभरातील स्थिती

            नवे रुग्ण       उपचाराधीन रुग्ण

१ फेब्रुवारी :     ५०           ७९७

२ फेब्रुवारी :     ३७           ७३७

३ फेब्रुवारी :     ८९           ७६५

४ फेब्रुवारी :     ६२           ७६२

५ फेब्रुवारी :     ८१           ७८९

६ फेब्रुवारी :     ६६           ७९४

७ फेब्रुवारी :     ६३            ८१२

८ फेब्रुवारी :     ५६            ८२३

९ फेब्रुवारी :     ५७            ८१९

१० फेब्रुवारी :    ८४            ८२५

११ फेब्रुवारी     ७१             ८३७