रुग्ण दुपटीचा दर ५० ते ६० दिवसांवर

संतोष जाधव, लोकसत्ता

नवी मुंबई : नवी मुंबईतील इमारतींच्या परिसरात रुग्णवाढीचा वेग अद्याप आटोक्यात आलेला नसला तरी तुर्भे येथील झोपडपट्टी परिसरात रुग्णसंख्या एक आकडी झाली आहे. तुर्भेत करोनाचा रुग्ण दुपटीचा दर हा ५० ते ६० दिवसांवर आला आहे.

शहरातील बाधितांचा आकडा १० हजारच्या वर गेला आहे, तर ३०० हून अधिक जण मृत्युमुखी पडले आहेत.

तुर्भे ही नवी मुंबईतील मोठी झोपडपट्टी आहे. या विभागात पालिकेची चार नागरी आरोग्य केंद्रे आहेत. यात तुर्भे स्टोअर, इंदिरानगर, पावणे आणि सानपाडा परिसरात मोठी लोकसंख्या आहे. या ठिकाणी बाधित आढळल्यास संसर्गाचा वेग वाढण्याची भीती व्यक्त केली जात होती. याच वेळी तुर्भेची तुलना मुंबईतील धारावी झोपडपट्टीशी केली जात होती. मुंबई पालिकेने धारावी परिसरात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळवले. धारावीतील रुग्णसंख्या घटल्यानंतर तेथील कामाची ‘आयसीएमआर’ने दखल घेतली. याच धर्तीवर तुर्भे झोपडपट्टी परिसरातही पालिका अधिकारी, आशासेविका, स्थानिक सामाजिक संस्थांच्या मदतीने प्रादुर्भाव रोखण्यात यश आले आहे.

सामूहिक प्रयत्नांमुळे यश

रहिवाशांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद, पालिकेच्या आरोग्य विभागाने आखून दिलेल्या शिस्तीचे पालन यासह पालिका अधिकाऱ्यांनी दाखवलेली तत्परता आणि निर्णयक्षमता यामुळे येथील रुग्णसंख्या आटोक्यात आली. तुर्भे परिसरात सभागृह, शाळा अशा ठिकाणी नागरिकांची तपासणी करण्यात आली. याच वेळी झोपडपट्टी भागातील डॉक्टर तसेच औषधांच्या दुकानांतील केमिस्टांचे गट तयार करून त्यांच्या मदतीने नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली. त्यामुळे करोनाविषयी असलेले गैरसमज आणि भीती दूर झाली. नागरिकांनी उपचार पद्धतीला चांगला प्रतिसाद दिला.  तुर्भेचा कित्ता गिरवल्यास करोना नियंत्रणात येऊ शकण्याच्या आशा निर्माण झाल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते महेश कोटीवाले यांनी दिली.

             आजवरचे रुग्ण          रुग्ण        बरे झालेले          मृत्यू

सानपाडा –              ५११          १४६           ३५०                    १५

पावणे                     १८८            ३१          १५१                      ३

इंदिरानगर              १०३               ७           ८४                     ०

तुर्भे स्टोअर              ५२१             ६          ४६८                     २९

 

तुर्भे झोपडपट्टीत रुग्णसंख्या कमी झाली आहे. रुग्णसंख्या दुप्पट दर ५० ते ६० दिवसांवर आला आहे.

– समीर जाधव, विभाग अधिकारी, तुर्भे