एनआरआय संकुल परिसरात वृक्षतोड; पालिका, सिडकोचे दुर्लक्ष

नवी मुंबई महापालिका व सिडको क्षेत्रात मोकळ्या जागांवर बेकायदा भराव टाकण्याचे प्रकार घडत असताना उच्चभ्रू वस्ती असलेल्या एनआरआय कॉप्लेक्सच्या बाजूला वनश्री सोसायटी समोर सेक्टर-५८ येथील मोकळ्या भूखंडावर बेकायदा भराव टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. मोठय़ा प्रमाणात वृक्षतोडही करण्यात येत आहे. त्यामुळे रहिवासी नाराजी व्यक्त करीत आहेत. याबाबत महापालिका व सिडकोकडे तक्रारही करण्यात आली आहे.

नेरुळ, सीवूड्स परिसरातील एनआरआय कॉम्लेक्स परिसरात घरांचे व जागांचे भाव तुलनेने अधिक आहेत. सीवूड्स सेक्टर-५८ येथे सुरू असलेल्या कामामध्ये पोकलेनच्या साहाय्याने मोठा खड्डा तयार करण्यात आला आहे. त्यातून निघालेली माती खाडीकिनारी टाकून भराव करण्यात येत आहे. सभोवताली पत्रे लावून हे काम रात्रंदिवस करण्यात येत आहे. या भूखंडावर असलेली गुलमोहर व इतर झाडे पोकलेन यंत्राच्या साहाय्याने उखडून टाकण्यात आली आहेत. ती झाडे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. तिथे काम सुरू असल्याचे दर्शवणारा फलक लावण्यात आलेला नाही. ज्या खाडीकिनारी मोठय़ा प्रमाणात रोहित पक्षी येतात त्याच ठिकाणी आता भराव टाकण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पालिका व सिडकोने या ठिकाणी काम करण्यास परवानगी दिली असल्यास, संबंधित ठेकेदाराने तेथे फलक लावणे अत्यावश्यक आहे. परंतु अशा प्रकारचा कोणताही फलक नसल्याने हे काम अधिकृत आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

सिडको व पालिकेने या ठिकाणी बांधकामास परवानगी दिली असेल तर ते दर्शवणारा फलक का लावण्यात आला नाही. जर हे काम अनधिकृतपणे सुरू असले तर पालिका व सिडकोने संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत. याबाबत पालिका व सिडकोशीही पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

दत्ता घंगाळे, जिल्हाध्यक्ष, भाजप

एनआरआय कॉप्लेक्स फेज-२ मागील मोकळ्या भूखंडावर मोठय़ा प्रमाणात झाडे तोडण्यात आली आहेत. त्याबाबत पोलीस ठाण्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. संबंधितांची तपासणी करून गुन्हे नोंदवण्याबाबतचे पत्र पोलिसांना देण्यात आले आहे.

तुषार पवार, उपायुक्त, उद्यान विभाग