|| विकास महाडिक

निविदेस विलंब झाल्याने लांबणीवर पडण्याची शक्यता

ठाणे खाडीवर वाशी येथे बांधण्यात येणाऱ्या तिसऱ्या पुलाच्या कामाला पावसाळ्यानंतरच सुरुवात होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या पुलाचे काम मे महिन्यात सुरू होणे अपेक्षित होते. मात्र रस्ते विकास महामंडळाने दोन बांधकाम कंत्राटदारांबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे काम लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एक हजार ८०० मीटर लांबीच्या या पुलावर रस्ते विकास महामंडळ ७७७ कोटी रुपये खर्च करण्यास तयार असून या कामासाठी तीन वर्षांची मुदत देण्यात आली आहे. सिडको २०० कोटी रुपये देणार आहे. खर्च वसूल करण्यासाठी टोल कंपनीला २०३६ पर्यंत टोल वसुलीची मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदत २०२६ मध्ये संपणार होती.

नवी मुंबईतून जाणाऱ्या दोन महामार्गावर मागील काही वर्षांत वाहतूक वाढली आहे. त्यात शीव-पनवेल महामार्गाचे क्राँक्रिटीकरण व रुंदीकरण झाल्यानंतर या वाहतुकीचा वेग वाढला आहे. पुणे, गोव्याहून ुवेगात येणारी वाहने वाशी टोल नाक्यावर संथ होतात. त्यामुळे  तिथे दोन किलोमीटरची रांग लागते. मुंब्रा बाह्य़वळण बंद झाल्यानंतर या मार्गावर वाहतूक कोंडी वाढली आहे. ऑगस्टमध्ये दुसऱ्या पुलाला तडे गेल्याने या पुलांची वापर करण्याची मुदत संपुष्टात आल्याचे दिसते.

रस्ते विकास महामंडळाने गेल्या वर्षी या दोन पुलांच्या मधोमध सहा मार्गिकांचा पूल बांधण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यासाठी ७७७ कोटी रुपये खर्च होणार असून तीन वर्षांची मुदत आहे. यासाठी टाटा, एसटी, अ‍ॅफ्रोन, सिप्लेक्स, गॅमन या पाच बांधकाम कंपन्यांनी स्वारस्य दाखविले आहे.

जानेवारीमध्ये यातील एका कंपनीने निविदा दाखल केली होती. एकच निविदा आल्याने निविदा पुन्हा बोलविण्यात आली. त्यानंतर दोन निविदाकारांनी निविदा दाखल केल्या त्यांच्याबाबत एमएसआरडीसी संचालक मंडळात अद्याप निर्णय झालेला नाही. निविदेची ही मुदत १८० दिवस असल्याने मार्च आणि मेदरम्यान या पुलाच्या कामाला होणारी प्रत्यक्ष सुरुवात आता लांबणीवर गेली आहे. पावसाळ्यानंतरच या निविदेवर महामंडळ आणि राज्य सरकार निर्णय घेणार आहे. सप्टेंबरमध्ये या कामाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

दोन पूल जीर्ण

मुंबई व नवी मुंबईला जोडणाऱ्या पहिल्या खाडीपुलाची उभारणी जून १९७१मध्ये करण्यात आली. त्या वेळी या पुलावरून १२ हजार ५०० वाहनांची ये-जा होईल, असे गृहीत धरण्यात आले होते. ती १७ हजार ५०० झाल्याने राज्य सरकारने १९८७ मध्ये नवीन खाडी पूल बांधला. तो १९९७ला वाहतुकीस खुला झाला. हे दोन पूल आता जीर्ण झाले आहेत.