ऐरोली सेक्टर २० मधील कांदळवनात दोन अल्पवयीन मुले एका महिलेला जबरदस्तीने घेऊन गेल्याची घटना उघडकीस आली आहे. एका नागरिकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्वरित येत या महिलेची सुटका केली. या घटनेमुळे कांदळवनातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ही महिला कचरा वेचणारी असून अल्पवयीन मुले झोपडपट्टीवासीय आहेत. नवी मुंबईतील खाडी परिसरामध्ये कांदळवन मोठय़ा प्रमाणात आहे. या कांदळवनामधील झुडपांचा मद्यपी, प्रेमी युगुल, गर्दुल्ले फायदा घेतात. ऐरोली सेक्टर २० मधील नेव्हा गार्डन सोसायटीसमोरच्या कांदळवनात दोन अल्पवयीन मुले एका महिलेला जबरदस्तीने नेत असल्याचे एका नागरिकाने पाहिले. त्याने ताबडतोब पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी त्वरित तेथे दाखल होत त्या महिलेची सुटका केली व या मुलांना समज देऊन त्यांच्या आई-वडिलांकडे सोडले. महावितरण कॉलनीनजीक असणाऱ्या उच्च दाबाच्या विद्युतवाहिन्यांखाली असणाऱ्या झोपडपट्टीतील मुलांनी हा प्रकार केला असल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे नेव्हा गार्डन उद्यानामध्ये सकाळी फेरफटका मारण्यासाठी येणारे नागरिक धास्तावले आहेत.