दिशादर्शक फलक, गतिरोधक नसल्याने वाहनचालकांचा गोंधळ

महापे-शिळफाटा रस्ता प्रशस्त बनवण्यात आला असला तरी या मार्गावरील अपघातांचे सत्र काही थांबताना दिसत नाही. सहापदरी रस्ता केल्याने या मार्गावरील गती वाढली आहे, मात्र दिशादर्शक फलक आणि गतिरोधक नसल्याने धोका वाढला आहे.

चारच दिवसांपूर्वी एका बसला पुलाखालून वळण घेताना घणसोलीच्या दिशेने जाणाऱ्या टँकरची धडक बसून अपघात झाला. नवी मुंबईतील अत्यंत महत्त्वाचा रस्ता म्हणून महापे-शिळफाटा रस्ता ओळखला जातो. आशियातील सर्वात मोठय़ा औद्योगिक पट्टय़ात हा मार्ग आहे. पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र व नवी मुंबई, ठाणे, सीप्झ, मुलुंड औद्योगिक वसाहतींना जोडणारा असल्याने या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते.

या रस्त्याचे अलीकडेच काम झाले असून सहापदरी सिमेंट काँक्रीटचा रस्ता बनविण्यात आला आहे. बिझनेस पार्क आणि महापे सर्कल येथे उड्डाणपूल बांधण्यात आले. त्यामुळे महापे ते शिळफाटा हे अंतर एक ते दीड तासाऐवजी आता अवघ्या २० मिनिटांवर आले आहे.

असे असले तरी या रस्त्यावरील अपघात मात्र कमी होताना दिसत नाहीत. या रस्त्यावर कुठेही मार्गिका दाखवणारे पट्टे नसल्याने वाहन चालवताना वाहनचालकांचा गोंधळ उडतो. रस्त्याच्या कडेला पिवळा पट्टा रंगवण्यात न आल्याने रात्रीच्या वेळी दुचाकी, चारचाकी गाडय़ा अंदाज न आल्याने रस्त्याच्या खाली उतरतात, उड्डाणपूल सुरू होण्यापूर्वी दिशादर्शक फलक किंवा रंगीत पट्टा लावण्यात आलेला नाही. गतिरोधकही बसवण्यात आलेले नाहीत. एकाही ठिकाणी दिशादर्शक फलक नाही, उड्डाण पुलाच्या खालून वळण घेताना वा रस्ता ओलांडताना नेमका कुठून रस्ता आहे हेच फलक न लावल्याने लक्षात येत नाही. त्यामुळे वाहनचालकाचा गोंधळ उडत आहे. पुढील वाहनांच्या गोंधळामुळे मागील वाहनाला गतीवर नियंत्रण ठेवणे अशक्य होत आहे.

याशिवाय सदर रस्त्याला एमआयडीसीमधील अनेक रस्ते येऊन मिळतात. अशा ठिकाणीही गतिरोधक वा सूचना फलक लावण्यात आलेले नसल्याने अपघाताची शक्यता वाढत आहे.

मार्गिकांचे पट्टे मारण्यात आले होते, मात्र ते मिटले आहेत. दिशादर्शक फलक, गतिरोधक व इतर कामे पावसाळ्यापूर्वी केली जातील. या अनुषंगाने योग्य ते निर्देश दिले जातील.   – प्रशांत चाचरकर, उपअभियंता, एमएसआरडीसी.