07 March 2021

News Flash

करोना चाचणी अहवालाला विलंब; डॉक्टरसह पत्नीचा मृतदेह पाच दिवसांपासून शवागारातच!

पालिकेच्या कारभाराविषयी व्यक्त केला जातोय संताप

संग्रहित छायाचित्र

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सीवूड सेक्टर ४८ येथील एका डॉक्टरचा रविवारी वाशी येथील पालिका रुग्णालयात मृत्यू झाला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांच्या पत्नीचेही याच रुग्णालयात निधन झाले. या दोघांचाही करोना चाचणी अहवाल पाच दिवस झाले तरी पालिकेला प्राप्त न झाल्याने त्या दोघांचेही मृतदेह पालिकेच्या शवागृहात ठेवण्यात आले आहेत. त्यांचा मुलगाही पालिकेच्या रुग्णालयातच दाखल आहे. एकीकडे पती-पत्नीचे निधन होऊनही करोनाच्या चाचणी अहवालासाठी होत असलेल्या विलंबामुळे सीवूड्स सेक्टर ४८ येथील रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली असून पालिकेच्या कारभाराविषयीही संताप व्यक्त केला आहे. अजून किती दिवस या मृत दाम्पत्याचा चाचणी अहवाल मिळण्यास विलंब लागणार? असा संतप्त सवाल नागरिक विचारु लागले आहेत.

सीवूड्स सेक्टर ४८ या विभागात राहणारे डॉक्टर हे मुंबईतील गोवंडी विभागात दवाखाना चालवतात. करोनाच्या कहरामुळे सुरुवातीला काही दिवस दवाखाना बंद होता. त्यानंतर पालिकेच्या आवाहनानंतर त्यांनी पुन्हा दवाखाना सुरु केला. परंतू, त्यांची प्रकृती खराब झाल्याने तसेच डॉक्टर असल्याने त्यांनी स्वतःच स्वतःवर उपचार केले. परंतू, रविवारी ३ मे रोजी त्यांचे घरातच निधन झाले. त्यानंतर त्यांची पत्नी आणि मुलाने ही बाब सोसायटीतील नागरिकांना सांगितल्यानंतर त्यांनी पालिकेशी आणि खासगी रुग्णालयाशी संपर्क केला. त्यानंतर पालिकेच्या रुग्णवाहिकेतून त्यांना वाशी येथील रुग्णालयात नेले. तेथे त्यांना मृत घोषीत करण्यात आले. परंतू, करोनाच्या धोक्यामुळे मृत झालेल्या व्यक्तीची मरणोत्तर चाचणी करण्यासाठी त्यांचे नमुने करोना चाचणीसाठी पाठवण्यात आले. त्यानंतर सायंकाळी पत्नीलाही अत्यवस्थ वाटू लागल्याने त्यांनाही नेरुळ व वाशी येथील रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. परंतू, सायंकाळी रात्री पालिकेच्या रुग्णवाहिकेतून त्यांना वाशी रुग्णालयात नेल्याची माहिती स्थानिकांनी दिली. तर, पालिकेने पतीचे निधन झाल्यानंतर पालिकेच्या रुग्णालयातूनच त्यांना घरी नेले व त्यानंतर परत रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले अशी माहिती त्यांनी दिली. त्यांनतर पत्नीचेही दुसऱ्या दिवशीच निधन झाले.

दरम्यान, या दोघांचेही करोना चाचणी अहवाल पाच दिवसांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे या दाम्पत्याचे मृतदेह शवागृहातच ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, डॉक्टरांचा १७ वर्षाचा मुलगाही रुग्णालयात दाखल आहे. पालिकेने या सोसायटीचा परिसर निर्जंतुक केला असल्याचे बेलापूर विभाग अधिकाऱ्यांनी सांगितले. तर “करोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. करोनाचाचणी अहवाल जे. जे. रुग्णालयात पाठवले जातात. या पती-पत्नीचे अहवाल अद्याप प्राप्त झाले नसल्याने त्यांचे मृतदेह शवागृहात ठेवण्यात आले आहेत. तपासणी अहवाल मिळण्यास विलंब होत असल्याने खासगी लॅबमधून अहवाल प्राप्त करुन घेण्याचा प्रयत्न आहे, असे पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले.

डी. वाय. पाटील रुग्णालयात लॅब सुरु होण्यासही विलंब

डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात करोना लॅब सुरु करण्याची तयारी केली आहे. परंतू, तेथेही आवश्यक उपकरणे प्राप्त होत नसल्याने अजून ८ दिवसांचा विलंब लागणार असल्याची माहिती डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयाचे डॉ. राहुल पेड्डेवाड यांनी दिली. याठिकाणी करोना लॅब तयार झाल्यास एका दिवसाला ५०० करोना चाचण्या करता येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2020 9:04 pm

Web Title: delay in corona test report bodies of wife and doctor husbund in mortuary for five days aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Coronavirus : नवी मुंबईच्या रुग्ण दुपटीचा वेग सहा दिवसांवर
2 ‘करोना’साठी नवी मुंबईत १४२० खाटांचे नियोजन
3 एपीएमसीतून इतर जिल्ह्य़ातही संसर्ग
Just Now!
X