राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील यांच्या वक्तव्याने चलबिचल; शशिकांत शिंदेंचे प्रत्युत्तर

राज्यातील माथाडी कामगारांची बलाढय़ संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटनेचे नेते व राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘कधी घरी (पक्षात) येऊ’ असे जाहीर आश्वासन दिल्याने या संघटनेते फुटीचे बीज पेरले गेले आहे. याच संघटनेचे दुसरे नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी वैयक्तिक कोणी कुठच्या पक्षात जावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण संघटना कोणाच्या दावणीला बांधून दिली जाणार नाही, असे प्रतिआव्हान दिले आहे. त्यामुळे माथाडी कामगार संघटना फुटीच्या उंबरठय़ावर येऊन ठेपली आहे.

माथाडी कामगार संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांची ८३ वी जयंती रविवारी वाशी येथील एपीएमसी बाजारात साजरी केली गेली. त्या निमित्ताने मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. यापूर्वी या संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमांना काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेतेच हजेरी लावत होते. राज्यातील सर्वात मोठय़ा कामगार संघटनेच्या नेत्याला गळास लावण्यासाठी भाजपने पद्धतशीर जाळे पसरले आहे. या पाश्र्वभूमीवर पाटील यांचे अंर्तगत विरोधक आमदार शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया कडवट आहे. पश्चिम महाराष्ट्रातील माथाडी कामगार शरद पवार यांना मानणारा  आहे. ही बांधिलकी पक्षापेक्षा व्यक्तीला आहे. त्यामुळे संघटनेते विविध पक्षाचे कार्यकर्ते आहेत. संघटना एका पक्षाच्या दावणीला बांधून दिली जाणार नाही असे स्पष्ट केले. पाटील यांची विधान परिषद मुदत दोन वर्षांत संपत आहे. त्यासाठी त्यांनी हे दबावतंत्र वापरले आहे का, अशीही चर्चा केली जात आहे.

‘तुमचा योग्य तो सन्मान करू’

माथाडी म्हणजे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची ताकद असे समीकरण आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला पहिल्यांदाच भाजपचे नेते उपस्थित राहिले. त्यात काही महिन्यांपासून संघटनेचे नेते आमदार नरेंद्र पाटील यांची मुख्यमंत्र्यांशी जवळीक वाढली असून कामगारांचे प्रश्न सुटणार असतील तर मी मुख्यमंत्र्यांच्या घरची भांडीदेखील घासायला तयार आहे, अशा प्रकारचे वक्तव्य केले. रविवारी पुन्हा कधी येऊ घरात अशी विचारणा केली आहे. त्यामुळे व्यासपीठावरून खाली गेलेले मुख्यमंत्र्यांनी माघारी वळून तुम्हाला भांडी घासायची वेळ येणार नाही, माथाडी कामगारांचा योग्य सन्मान करू, अशी ग्वाही दिली.