News Flash

देवगडच्या हापूस आंब्याची मुंबईच्या बाजारात झलक

काही हापूस आंबा बागयतदार नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून हापूस आंब्याचे पीक काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.

एपीएमसी बाजारात चार पेटय़ा दाखल; एक पेटी दहा हजार रुपयांच्या घरात

नवी मुंबई : वातावरणातील बदलामुळे यंदा कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम दोन महिने लांबणीवर गेलेला असतानाच गुरुवारी वसंत पंचमीच्या मुहूर्तावर देवगड तालुक्यातील हापूस आंब्याच्या चार पेटय़ा तुर्भे येथील घाऊक फळबाजारात दाखल झाल्या आहेत.

सर्वसाधारणपणे जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात येणारा हा प्रयोगशील हापूस आंबा एक महिना उशिराने बाजारात आला आहे. आंब्याची एक पेटी दहा हजार रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे एक हापूस आंबा १६६ रुपयांना पडणार आहे.

कोकणात यंदा हापूस आंब्याचा हंगाम लांबणीवर पडला आहे. हापूस आंब्यावर अद्याप मोहराचा पत्ता नाही. कडाक्याची थंडी आणि त्याच काळात तीव्र उष्णता यामुळे हापूस आंब्यावर अद्याप मोहर धरलेला नाही.

मात्र काही हापूस आंबा बागयतदार नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून हापूस आंब्याचे पीक काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. यात सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील देवगड तालुक्याचे अरविंद वाळके (कुणकेश्वर) हे हापूस आंबा बागायतदार या प्रयोगात यशस्वी झाले आहेत. त्यांच्या हापूस आंब्यांना नोव्हेंबर महिन्यात मोहर आल्याने मध्यम व मोठय़ा प्रकारचे हापूस आंबे तयार झाले आहेत. त्यांनी या हापूस आंब्याच्या पाच डझनांच्या चार पेटय़ा व्यापारी संजय पानसरे यांच्याकडे पाठविल्या आहेत.

सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

पाच डझनांच्या एका पेटीची किंमत ही १० ते ११ हजार रुपये आहे. त्यामुळे सध्या एक हापूस आंबा १६६ रुपयांना पडणार आहे. तो सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. बाजारात आलेला हा हापूस आंबा येत्या दहा ते बारा दिवसांत पिकणार आहे. हंगामातील पहिला हापूस आंबा खाण्यासाठी मुंबईतील उच्चभ्रू वस्तीतील ग्राहकांची स्पर्धा लागत असल्याचे पानसरे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 12:28 am

Web Title: devgad hapus mango mumbai apmc market akp 94
Next Stories
1 विस्तारित पामबीचच्या मार्गातील अडथळा दूर
2 सिडकोकडून तीन हजार पोलिसांना घरे
3 राजकीय हालचालींना वेग
Just Now!
X