14 August 2020

News Flash

भाज्या-फळ्यांचे दर दुप्पट   

किरकोळ विक्रेत्यांच्या मनमानीमुळे

संग्रहीत छायाचित्र

विकास महाडिक

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत झालेल्या दरवाढीने सर्वत्र संताप व्यक्त होत असताना राज्यातील किरकोळ बाजारात करोनासारख्या महासाथीचा गैरफायदा घेत धान्य आणि भाजीपाला या जीवनावश्यक वस्तूंच्या दरात विक्रेत्यांनी भरमसाठ वाढ केल्याचे दिसून येत आहे.

घाऊक बाजारात आठ रुपये प्रति किलो असलेला कांदा किरकोळ बाजारात चाळीस रुपये किलोने विकला जात आहे, तर साठ रुपयांचा लसूण तिप्पट दराने खरेदी करावी लागत आहे. काही प्रमुख भाज्यांसाठी दुप्पट दर आकारले जात आहेत. किरकोळ बाजारावर सरकारचे कोणतेही नियंत्रण नसल्याने ग्राहकांना ही दरवाढ निमूटपणे सहन करावी लागत आहे.

‘एपीएमसी’ घाऊक बाजारात कांदा, बटाटा, लसूण, तांदूळ, गहू, तूरडाळ, मसूरडाळ, तेल, साखर, नारळ, अनेक भाज्या यांचे दर गेल्या काही महिन्यांत स्थिर आहेत. मुंबई आणि उपनगरांतील किरकोळ बाजारात मात्र त्यांचे दर दुप्पट किंवा तिप्पट आकारले जात आहेत. भेंडी, फ्लॉवर, कोबी, गाजर, टोमॅटो या सर्वाधिक मागणी असलेल्या भाज्या ८० ते १२० रुपये किलोने किरकोळ बाजारात विकल्या जात आहेत मात्र या भाज्या घाऊक बाजारात २० ते ३० रुपये प्रति किलो आहेत.

फळांचे दरही वधारले..

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मोठय़ा प्रमाणात फळांचे सेवन होत आहे. त्यामुळे फळांच्या किंमती देखील वाढल्या आहेत. ९० ते १०५ रुपये किलोने मिळणारे हिमाचल सफरचंद किरकोळ बाजारात १५० ते २०० रुपये किलोने खरेदी करावी लागत आहेत. ४७ रुपये प्रति किलो असलेले डाळींब किरकोळ बाजारात दीडशे रुपयांना विकले जात आहेत. केळी ५० रुपये डझनापेक्षा कमी किमंतीत मिळत नाहीत असे मुलुंडच्या गृहिणी आरती शिंदे यांनी सांगितले.

मोठी तफावत..

* घाऊक बाजारात कांदा आठ रुपये किलो असताना किरकोळ बाजारात तो ३० ते ४० रुपयांनी विकला जात आहे.

* बटाटय़ाचा भाव प्रति किलो १९ रुपये असताना तो ३० ते ३५ रुपयांनी विकला जात आहे. लसूण साठ रुपये किलो आहे.

* किराणा दुकानांत तो १८० ते २०० किलोने विकला जात आहे. २५ रुपये किलोचा तांदूळ ६० ते ७० रुपये किलोने विकत घ्यावा लागत आहे.

* मसूर आणि तूर डाळीचा दरही ३० ते ४० रुपये अधिक आहे.

२० ते २५ रुपये दराने मिळणाऱ्या नारळास किरकोळ विक्रेते ४० रुपये आकारत आहेत

करोनाकाळात आयुष मंत्रालय जाहीर केलेल्या उपचार पध्दतीमुळे आले आणि हळदीचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे ५० रुपये किलो असलेले आले किरकोळ भाजी विक्रेते १२० ते १४० रुपये किलोने विकत आहेत तर हळदही २२० ते २५० रुपये किलोने मिळत आहे.

धान्य बाजारातील दर नियंत्रणात आहेत, पण किरकोळ बाजारातील दरवाढ कैकपटीने वाढली आहे. त्याचा फायदा शेतकरी अथवा ग्राहकांना होत नाही. विक्रेत्यांनी संकटात संधी साधल्याचे दिसून येत आहे. आम्ही ग्राहकांपर्यंत थेट विक्री करु शकतो.

– निलेश विरा, संचालक, धान्य बाजार एपीएमसी

भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे तेजी-मंदी सुरु आहे, पण किरकोळ बाजारातील भाज्यांचे दर वाटेल तसे आहेत. सरकारचे या विक्रेत्यांवर कोणतेही नियंत्रण नसल्याने त्यांची मनमानी सुरु आहे.

– शंकर पिंगळे, संचालक, भाजी बाजार, एपीएमसी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2020 12:31 am

Web Title: double the price of vegetables abn 97
Next Stories
1 नवी मुंबई : महापालिका मुख्यालयात करोनाचा शिरकाव, कामकाज अद्याप सुरुच!
2 खासगी रुग्णालयांकडून अवाढव्य खर्चाचा डोस
3 अत्यवस्थ रुग्ण वाऱ्यावर
Just Now!
X