तुटक्या झाकणांमुळे अपघातांची शक्यता

नवी मुंबई कळंबोली वसाहत परिसरातील काही गटारांवरील झाकणे तुटली असून काही गटारांवरील झाकणे गायब झाली आहेत. गटारांवर झाकणे नसल्याने या ठिकाणी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. सिडको आणि महापालिका प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन गटारांच्या झाकणांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

कळंबोळी सेक्टर ५ मधील सेंट जोसेफ शाळा ते हिंदुस्तान बँकलगतच्या पदपथ-गटारांवरील काही झाकणे तुटली असून काही झाकणे गायब झाली आहेत. शालेय विद्यार्थी, पादचारी आणि बॅंकेत येणाऱ्या ग्राहकांना या दुरवस्थेचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरात अनेक ठिकाणी सांडपाणी वाहून नेण्यासाठी भूमिगत वाहिन्या टाकून गटारे बांधण्यात आली आहेत. गटारांवरीलही झाकणांची दुरवस्था झाली असून काही ठिकाणची झाकणे निघालेली आहेत. ‘सिडको’च्या  बांधकाम विभागातील अभियंत्यांनी वेळोवेळी याचा आढावा घेऊन त्याप्रमाणे कार्यवाही करावी, असे नागरिकांचे म्हणणे आहे. याविषयी स्थानिक नगरसेवक संजय पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ  शकला नाही. तर या संदर्भात ‘सिडको’कडून बुधवारी सर्वेक्षण करण्यात आले असून येत्या तीन ते चार दिवसात या झाकणांची दुरुस्ती केली जाईल. तसेच जेथे गटारांवर झाकणे नाहीत तेथे ती बसविण्यात येतील, अशी माहिती ‘सिडको’चे कार्यकारी अभियंता गिरीश रघुवंशी यांनी दिली.