विकास महाडिक

राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाची केवळ औपचारिकता बाकी आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मंदा म्हात्रे, विजय चौगुले यांच्यासह रमेश पाटील यांचे चिरंजीव अ‍ॅड. चेतन व विशाल पाटील यांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. त्याचप्रमाणे आठ महिन्यानंतर येणारी पालिका निवडणुकीचे रणशिंगही यानिमित्ताने नाईकांनी फुंकले आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या राजन विचारे यांना ८४ हजाराचे मतधिक्य मिळालेले आहे. त्यात भाजपचा जनाधार कमी आहे. त्यामळे भाजपचा अर्थात नाईकांचा सामना हा शिवसेनशी राहणार आहे.

राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री गणेश नाईक भाजपच्या उंबरठय़ावर आहेत. त्यांच्या प्रवेशाची केवळ औपचारिकता बाकी आहे. त्यांचे आमदार चिरंजीव संदीप नाईक यांनी रीतसर राष्ट्रवादीच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजप प्रवेश केला आहे. ‘कोकरू उचललं की बकरी मागून आपोआप येते’.. नाईक महिनाअखेर भाजपचे कमळ हाती घेतील. त्याशिवाय त्यांना आता दुसरा पर्याय नाही.

पुत्रप्रेम, विधानसभा अस्तिवाची भीती, आणि  शहरातील सद्दी टिकवून ठेवायची असेल तर अशा कोलांटउडय़ा घेतल्याशिवाय पर्याय नाही. मागील पाच वर्षांत नाईकांची शहरावरील पकड ढिली झाली असून एक हाती सत्ता आणण्याचे दिवस आता सरले आहेत. त्यामुळे प्रबळ पक्षाची कास धरण्याशिवाय या पुढील काळात नाईकांना दुसरा पर्याय नाही. शिवसेना, राष्ट्रवादी असे दोन प्रादेशिक पक्ष झाल्यानंतर आता नाईकांनी राष्ट्रीय पक्षाची धुरा हाती घेतली आहे. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण एकदम पलटले आहे. भाजपत प्रवेश करून नाईकांनी एका दगडात अनेक पक्षी मारल्याचे दिसून येते. बेलापूरच्या आमदार या नाईकांच्या कट्टर विरोधक. त्यांनीच त्यांना मागील निवडणुकीत अस्मान दाखविले आहे. म्हात्रे त्यावेळच्या मोदीलाटेत आरूढ झालेल्या आमदार आहेत, अशी टीका त्यांच्यावर पाच वर्षे केली जात आहे. म्हात्रे यांचे ढीगभर नसेल पण म्हात्रे निवडून आलेले दीड हजार मताधिक्य एवढा तरी मतदार संपर्क असल्याशिवाय त्या निवडून आलेल्या नाहीत. मोदी लाट असती तर ऐरोलीतूनही भाजपचा उमेदवार निवडून आला असता पण तसे झालेले नाही. निवडून आल्यानंतर त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवून दिलेली आहे. त्यामुळे त्यांना दुर्लक्षून चालणार नाही. त्या म्हात्रे यांना नाईक यांनी अस्वस्थ करून टाकले आहे. राष्ट्रवादीत असताना नाईक यांना म्हात्रे यांनी जेरीस आणले होते. त्यावेळी राष्ट्रवादीतून म्हात्रे यांना बळ दिले जात होते. नाईकांच्या भाजप प्रवेशाने बेलापुरात उमेदवारी कोणाला मिळणार याचा मनस्ताप दोन्ही उमेदवारांना सहन करावा लागणार आहे.

दुसरा जखमी केलेला पक्षी ऐरोलीतील आहे. नाईकांच्या तालमीत तयार झालेले आणि नंतर नाईकांनाच ठेंगा दाखविणारे त्यांचे शिष्य विजय चौगुले यांची भाजपबरोबर जवळीक वाढली आहे. ते पालिकेतील विरोधी पक्षनेते असताना त्यांची ऊठबस भाजपत जास्त आहे. त्यामुळे ऐरोलीत भाजपचे उमेदवार म्हणून त्यांची तयारी देखील सुरू झाली होती. सरकारनेही त्यांना वडार समाज समन्वय समितीचे सभापतिपद देऊन गाजर दिलेले आहे. नाईकांच्या भाजप प्रवेशाने त्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले आहे. ऐरोली मतदारसंघावर शिवसेनेचा डोळा आहे. मागील दोन निवडणुकीत शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिलेली आहे. त्यामुळे युतीत त्यांचा मतदार संघावरील दावा योग्य असल्याने अनेक हवशे गवशे नवश्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. संदीप नाईक यांनी भाजप प्रवेश करून या वामनमूर्त्यांची स्वप्न भंग केली आहेत. भाजप हा मतदारसंघ नाईक यांच्यासाठी प्रतिष्ठेचा करणार हे निश्चित.

याच मतदारसंघात भाजपची स्वतंत्र ताकद अजमावायची वेळ आल्यास विधान परिषदेचे आमदार आणि अल्पावधीत दिल्ली ते गल्लीपर्यंत भाजपच्या गोटात लीलया मुशाफिरी करणारे कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील यांचे चिरंजीव अ‍ॅड. चेतन व विशाल पाटील यांचा विचार देखील केला गेला होता. त्या पाटील बंधूंना आता नाईक यांच्यासाठी काम करण्याची वेळ आली आहे. माथाडी नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा भाजप घरोबा सर्वाना माहीत आहे. त्याच प्रेमापोटी त्यांना साताऱ्यात रंगीत तालीम म्हणून भाजपने शिवसेनेच्या तिकिटावर उभे करण्यास वजन खर्ची केले. त्यांचा अपेक्षेप्रमाणे दारुण पराभव झाला. माथाडी मतदार संख्या जास्त असल्याने तेही ऐरोलीतून तयारीत होते. नाईकांच्या प्रवेशाने त्यांनाही संदीप यांची पालखी उचलावी लागणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत म्हात्रे, चौगुले, पाटील यांना बाद केल्यानंतर आठ महिन्यांनी येणारी पालिका निवडणुकीचे रणशिंग यानिमित्ताने नाईकांनी फुंकले आहे. पालिका निवडणूक आता सोपी राहिलेली नाही. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या राजन विचारे यांना ८४ हजाराचे मतधिक्य मिळालेले आहे. त्यात भाजपचा जनाधार कमी आहे. त्यामुळ भाजपचा अर्थात नाईकांचा सामना हा शिवसेनेबरोबर राहणार

आहे. राजकरणाच्या पटलावरील एक प्यादे इकडेतिकडे हलल्याने संपूर्ण शहराचा सारीपाट बदलून गेला आहे. नाईकांच्या भाजप प्रवेशाने स्थानिक नेते येत्या काळात खांदेपालट करण्याची शक्यता आहे.