वीजवाहिनीचे काम पूर्ण; चाचणी होताच वीजपुरवठा सुरू होणार

काळ्या पाषाणात कोरलेल्या शिव लेण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या आणि युनिस्कोने जागतिक ठेवा म्हणून घोषित केलेल्या उरण तालुक्यातील घारापुरी (एलिफंटा) बेटावर अद्याप नियमित वीजपुरवठा नाही. त्यामुळे येथील तीन गावे अंधारातच आहेत. याचा परिणाम येथील स्थानिकांसह पर्यटकांवरही होत आहे. हा अंधार दूर करण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली असून त्यासाठी १६ कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. हे काम येत्या महिनाभरात पूर्ण करण्यात येणार आहे. केबल टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्याच्या चाचणीचे काम सुरू आहे.

घारापुरी बेटाच्या एका बाजूला मुंबई तर दुसरीकडे जेएनपीटीतील दिव्यांचा लखलखाट असतो. मात्र, घारापुरीतील मूळनिवासींना मात्र अंधारातच राहावे लागते. पर्यटन विभाग व शासनाकडून बेटावर दोन तास जनरेटरच्या साहाय्याने वीजपुरवठा केला जातो. सध्याच्या वाढत्या वीजवापराच्या काळात ही सुविधा अपुरीच आहे. त्यातही वारंवार बिघाड होत असल्याने अंधारात दिवस काढावे लागत आहेत. शेजारीच जेएनपीटी बंदर असल्याने केबल टाकण्यात अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे न्हावा येथून सबमरिन केबल टाकून वीजपुरवठा करण्याचा निर्णय महावितरण कंपनीने घेतला आहे. ही केबल समुद्रात ७ ते १५ मीटर आतून टाकण्यात येत आहे. तीन मीटर खोदकाम करून ही केबल टाकण्यात आली आहे. या कामाला ओखी वादळाचाही फटका बसला होता. त्यामुळेही घारापुरी बेटावर वीजपुरवठा सुरू होण्यास विलंब झाला.

घारापुरी बेटावर वीजपुरवठा करण्यासाठी केबल टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. सध्या त्याची चाचणी सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागणार आहे. त्यानंतरच घारापुरीला वीजपुरवठा सुरू होईल.  – अब्दुल कबीर शेख, साहाय्यक अभियंता, महावितरण

गावातील विजेचे खांब तसेच इतर कामे पूर्ण झाली आहेत. परंतु वीजजोडणी देण्याचे आणि मीटर लावण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. ते झाल्याशिवाय वीजपुरवठा सुरू झाला असे म्हणता येणार नाही.    – बळीराम ठाकूर, सरपंच, घारापुरी