एमआयडीसीतील खड्डेग्रस्त रस्त्यांमुळे उद्योजकांत असंतोष

टीटीसी औद्योगिक पट्टय़ातील अंतर्गत रस्त्यांना रस्ते म्हणावे का, असा प्रश्न त्यावरून रोज ये-जा करणाऱ्या वाहनचालक आणि प्रवाशांना पडला आहे. येथील अनेक कारखान्यांमधील उत्पादित मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना या रस्त्यांवरून जाताना खड्डय़ांमुळे अडकून तरी पडावे लागत आहे वा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने लघू व मध्यम उद्योजकांच्या चिंतेत भर पडली आहे.

ठाणे-तुर्भे औद्योगिक पट्टय़ातील उद्योगांतून सर्वाधिक मालमत्ता कर आणि स्थानिक संस्था कर मिळत आला आहे, तरीही सार्वजनिक सुविधांसाठी या पट्टय़ाला नेहमीच दीर्घ प्रतीक्षा करावी लागली आहे.  उद्योजकांवर पालिकेच्या विविध करांचा बोजा सोसावा लागत असल्याने ‘उद्योग नको, पण कर आवर’ अशी वेळ आल्याची खंत काही उद्योजकांनी ‘लोकसत्ता महामुंबई’कडे मांडली. उद्योगासाठी आवश्यक असलेली अंतर्गत रस्त्यांची मागणीही पूर्ण केली जात नसेल तर उद्योग तरी कसा उभारायचा, असा यक्ष प्रश्न कारखानदारांना पडला आहे.

पालिकेने २० वर्षांनंतर दिघा ते महापे सर्कल आणि महापे ते तुर्भेपर्यंतच्या मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आणले आहे; परंतु मुख्य रस्त्याला जोडणारे सर्व अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

स्थिती अशी..

*  रबाळे येथील सनराज हॉटेल जवळ ‘आर’ विभागातील अंतर्गत रस्त्यांवर खड्डय़ांचे आकारमान वाढून त्यांचे आता तळ्यात रूपांतर झाले आहे.

* तुर्भे, शिरवणे, महापे, खैरणे आणि दिघा एमआयडीसी भागातील रस्त्यांची चाळण

* लघु आणि मध्यम उद्योजकांच्या संघटनांनी अनेकदा पत्र व्यवहार करूनही रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल कोणताही प्रतिसाद नाही

* रस्ते दुरुस्तीची जबाबदारी पालिकेची असल्याचे एमआयडीसीचे स्पष्टीकरण

 

एमआयडीसीला अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही अंर्तगत रस्त्याची दुरवस्थेची दखल घेतली जात नाही. पालिका केवळ कर वसूल करण्यासाठी असून मुख्य रस्त्याचे काम एका बडय़ा कंपनीच्या सोयीसाठी तातडीने करण्यात आले आहे.

– किरण चुरी, उद्योजक, रबाळे.