उरणच्या विमला तलाव येथे असलेल्या मोझिला कॅफेमध्ये बुधवारी सकाळी स्फोट झाला. यात एकूण पाच जण जखमी झाले असून एक जण गंभीर जखमी आहे.

या स्फोटामुळे शेजारील घरांनाही तडे गेले असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण झाले आहे. स्फोटानंतर सिडकोच्या अग्निशमन दलाने तातडीने ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. हे दुकान रस्त्यावर असल्याने या स्फोटात रस्त्यावरून जाणारे नागरिकही जखमी झाले असून गॅसचा स्फोट झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे कॅफेमधील कामगार दुकान उघडून आत गेले असता त्यांनी विजेचे बटण दाबले, त्याच क्षणी स्फोट झाला. स्फोट इतका मोठा होता की, यामुळे दुकानातील सर्व सामान हे रस्त्यावर दहा ते बारा फुटांवर उडाले. त्याच वेळी रिक्षा तसेच दुचाकीवरून जाणारे प्रवासीही जखमी झाले आहेत. यामध्ये मनीष सुरेंद्र हिरा, दमर मगततुल गुल, संगीता ठाकूर, संजय ठाकूर व गौरव शहा हे जखमी झाले आहेत. आगीचे कारण हे गॅसची गळती झाल्याने लागली असावी, अशी माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. बी. कोल्हटकर यांनी दिली. तसेच या अपघाताचा तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.