महापालिकेचे दुर्लक्ष; ठेकेदारांची मनमानी

एकीकडे पालिका स्वच्छता अभियानात अव्वलस्थानी येण्यासाठी खटाटोप करत असताना दुसरीकडे सार्वजनिक शौचालयांच्या ठेकेदारांकडून सामान्य नागरिकांची लूट केली जात आहे. शौचालयाच्या वापरासाठी निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. तुर्भे गणपतीपाडा येथे असा प्रकार घडला असून अतिरिक्त पैसे वसूल करणाऱ्या कर्मचाऱ्याकडे विचारणा करणाऱ्या शिवसेनेच्या एका शाखाप्रमुखाविरोधात तुर्भे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

नवी मुंबई शहरात मीना यांच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळात शहरातील सार्वजनिक शौचालयांच्या देखभाल दुरुस्तीबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. चार स्वयंसेवी संस्थांना ही शौचालये ३० वर्षांच्या कालावधीसाठी देखभाल दुरुस्तीसाठी देण्यात आली होती. त्याच वेळी शौचालयाचा वापर सशुल्क करण्यासाठी ५० पैसे तर कुटुंबासाठी प्रतिमहिना ५० रुपये आकारण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या काळात बैठी शौचालये तळमजला व पहिला मजला अशी अनेक शौचालये बांधण्यात आली. नि:शुल्क तत्त्वावरील शौचालयांच्या शौचकुपांना प्रतिमहिना प्रतिसीट्स २५० रुपये तर शौचालयातील मुतारींनाही प्रतियुनिट २५० रुपये देण्याचा प्रस्ताव २०१० मध्येच मंजूर झाला. परंतु एकीकडे देखभाल दुरुस्तीचा मोबदला पालिकेने नियमानुसार ठरवून दिल्यानंतरही सशुल्क शौचालयांमध्ये शौचासाठी नागरिकांकडून पाच रुपये घेतले जात आहेत. स्नानगृहासाठीदेखील अतिरिक्त पैसे आकारले जात आहेत. प्रति कुटुंबासाठी ५० रुपयांचा पास असताना संबंधित ठेकेदार घरातील प्रत्येक व्यक्तीचा स्वतंत्र पास दाखवण्याची मागणी करून अधिक पैसे उकळत आहेत.

नवी मुंबई शहरात विविध विभागांत झोपडपट्टय़ा आहेत. या ठिकाणची अवस्था अत्यंत दयनीय आहे. अनेक शौचालयांमध्ये ठेकेदाराचा माणूस नसतो. तर अनेक ठिकाणी वेळेवर पाणी नसणे, शौचालयाला दुपारी कुलूप लावणे असे प्रकार घडतात. हागणदारीमुक्त शहरासाठी पालिकेने वैयक्तिक शौचालयांसाठी अनुदान देऊन सुमारे ३००० हजार लाभार्थीना शौचालय बांधण्यास प्रवृत्त केले. त्यातून २५०० वैयक्तिक शौचालये बांधण्यात आली. एकीकडे शहर स्वच्छतेमध्ये शहरातील सार्वजनिक शौचालये महत्त्वाचा घटक ठरत असून याच सार्वजनिक शौचालयांमध्ये अतिरिक्त वसुलीचे प्रकार समोर येत आहेत. अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांना संपर्क साधला असता संपर्क झाला नाही.

शहरात अनेक ठिकाणी शौचालयांच्या वापरासाठी अतिरिक्त शुल्क वसुली सुरू आहे. याकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. तुर्भे येथील गणपतीपाडा परिसरात शिवसेनेचा शाखाप्रमुख याबाबत विचारणा करण्यासाठी गेला असता त्याच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे ठेकेदारांना पालिका अधिकाऱ्यांनी जाब विचारून कारवाई केली पाहिजे.      – विनोद मुके, विभागप्रमुख, तुर्भे