रिक्षा चालकांना आरटीओकडून परवाने दिले जाणार आहेत. यासाठी नुकतीच मराठीतून मौखिक चाचणी वाशी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात घेण्यात आली. यावेळी रिक्षाचालाकंच्या  घेण्यात आलेल्या चाचणीत रिक्षाचालकांनी कागदपत्रामध्ये घोळ केल्याचे उघडकीस आले आहे.

आधार कार्ड, वास्तव्याचा पुरावा, मतदान ओळखपत्रासाठी दिलेल्या पत्त्यावर मह त्त्वाची कागदपत्रे कशी दिली असावी हा प्रश्न पडला आहे. एका रिक्षा चालकाने सादर केलेल्या कागद पत्रामध्ये बेलापूरमधील सिडको कार्यालयाच्या खाद्यगृहाचा पत्ता देण्यात आला आहे. मॅफ्को या सरकारी महामंडळाच्या बंद असलेल्या दुकानाचा पत्ता देण्याचीदेखील करामत करण्यात आली आहे. अनेकांनी सरसकट दुकानाचे पत्ते आणि घर असल्याचे भासवून दिले आहे.

विशेष म्हणजे या पत्तयावर सर्व सरकारी कागदपत्रे बनविण्यात आली आहे. यात आधारकार्ड, पॅनकार्ड़, अधिवास प्रमाणपत्र, पोलिसांकडून मिळणारा चारित्र्य पडताळणीचा दाखला या सर्वासाठी याच पत्त्यांचा वापर करण्यात आला आहे.  ही सर्व कागदपत्रे बनावट असण्याची शक्यता आहे. समजणार नाही अशा पत्त्यांचा तर कहर करण्यात आला आहे.

खासगी व्यावसायिक आणि रोजगार असलेल्या अनेकांनी यासाठी चाचणी दिली आहे. विशेष म्हणजे कुठेही काम करीत नसल्याने शपथपत्रे न्यायधीशांच्या सहीने सादर करण्यात आली आहेत. एकूण  १९४३ रिक्षा चालकांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले होते. यात ६४ महिलांचा समावेश असून एकाच घराच्या पत्त्यावर तीन वेगवेगळया महिलांनी ही परीक्षा दिलेल्या  महिलादेखील यात  आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. या सर्व प्रकारची चौकशी करुनच व कागदपत्रांची पाहणी करुनच पुढील प्रक्रिया केली जाणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहनच्या आधिकांऱ्याने स्पष्ट केले आहे.  रिक्षा चालकांचे हे परमिट मिळवण्यासाठी बोगस कागदपत्रे आणि खोटे शपथपत्रे सादर करणाऱ्याची छाननी आता आरटीओ आधिकारी करणार असून लवकरच अशा बोगस रिक्षा चालक असलेल्या मुलाखत देणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली जाणार आहे.