डेटिंगचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळले

कॉल सेंटरद्वारे ग्राहकांशी संपर्क साधून महिलांना पुरवण्याचे  (डेटिंग) आमिष दाखवून त्यांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीस कोलकाता येथून अटक करण्यात आली आहे. ही टोळी फसवणूक झालेल्या ग्राहकांकडून जाब विचारण्यात आल्यावर त्यांनाच बदनामी करण्याबाबत धमकावून लाखो रुपये उकळत होती. त्यांच्या अटकेने नवी मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, बंगलोर, चेन्नई अशा अनेक ठिकाणी आतापर्यंत ३२० पेक्षा जास्त लोकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

अर्नब सिंग ऊर्फ नील रोय (२६), प्रबीर संतोस सहा (३५) आणि स्नेहा ऊर्फ माही रवी दास (२५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यात स्नेहा, अर्नब तर प्रबीर सहा हा आहे. या तिघांनी मिळून कोलकाता जवळील डमडम येथे कॉल सेंटर उघडले होते. विविध माध्यमातून मिळालेल्या पुरुषांच्या मोबाइल क्रमांकावर फोन लावून डेटिंगसाठी तरुणी मिळेल असे सांगून ठरावीक रक्कम ऑनलाइन घेतली जात होती, तर ग्राहकांनी सांगितलेल्या ठिकाणी ती येईल असे सांगितले जात होते मात्र, प्रत्यक्षात तिला पाठवलेच जात नव्हते. या बाबत ग्राहकांनी विचारणा केली असता आम्ही पोलीस बोलत आहोत, तुम्ही असले उद्योग करता का, आता गुन्हे शाखेची चौकशी तुमच्या मागे लावण्यात येईल, न्यायालयाच्या नोटीसवर नोटीस पाठवण्यात येतील अशा धमक्या देत ब्लॅकमेल करीत पुन्हा पैशांची मागणी केली जात होती.

हा अनुभव खारघर येथील एका व्यक्तीला आला असून अशाच पद्धतीने तब्बल ७३ लाख ५१ हजार ८४२ रुपये लुबाडून त्याची फसवणूक केली आहे. या बाबत खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केल्यानंतर तपास सुरू करण्यात आला. या गुन्ह्य़ाचा तांत्रिक तपास करीत असताना ज्या मोबाइलवरून फोन आले ते ठिकाणी कोलकाता असल्याचे समोर आले त्यानुसार पोलीस निरीक्षक महेश पाटील, उप निरीक्षक विक्रांत थारकर, पोलीस हवालदार बाबाजी थोरात आदींचे पथक कोलकाता येथे पाठवण्यात आले.

या पथकाने या कॉल सेंटरवर छापा टाकला असता आरोपी आढळून आले. हे कॉल सेंटर आर. एन्टरप्राइजेस नावाने चालवण्यात येत होते. याच ठिकाणाहून लोकॅटो आणि स्पीड डेटिंग सव्‍‌र्हिसच्या नावाखाली फसवणूक केली जात होती. या कॉल सेंटरवरून ४१ मोबाइल २ लॅपटॉप आणि शेकडो मोबाइल क्रमांक असलेली माहिती (डाटा) जप्त करण्यात आली. याच टोळीने फसवणूक केलेल्यांचा प्राथमिक आकडा ३००पेक्षा जास्त जात असला तरी प्रत्यक्षात यातील किती जणांनी तक्रारी केल्या आहेत याचाही शोध सुरू आहे. बदनामी टाळण्यासाठी पैसे दिले जात होते, अशी माहिती खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी दिली.

बनावट कागदपत्रे देऊन बॅँक खाती उघडली

या आरोपींनी दिलेल्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत होते. सदर बँक खाते बनावट कागदपत्रे देऊन उघडण्यात आली आहेत. त्यामुळे या आरोपींनी बँकेला फसवले की बँकेतील लोकांना हातीशी धरून बनावट खाती उघडण्यात आली. या बाबत चौकशी सुरू आहे तसेच, नेमके असे अजून किती खाती आहेत याचाही शोध सुरू आहे.