लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबईत : नियोजित नवी मुंबई शहरात आता झोपडय़ा व उघडय़ावर वास्तव्य करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. कोपरखरणे रेल्वे स्थानक परिसरात तर पदपथ अडवून संसार थाटले आहेत. हा परिसर बकाल होत असताना पालिका विभाग कार्यालयाकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

या परिसरात बेकायदा झोपडपट्टीचा हा प्रश्न अनेक वर्षांपासून आहे. या ठिकाणी सिडकोचे काही मोकळे भूखंड होते. त्यावर मोठय़ा प्रमाणात झोपडय़ा बांधण्यात आल्या होत्या. अतिक्रमण पथक कारवाईसाठी आल्याने त्यांच्यावर हल्ला झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी सिडकोने हे भूखंड खासगी विकासकांना विकले. या वेळी येथील बेकायदा झोपडय़ा हटविल्या होत्या. येथील झोपडीवासीयांनी आता याच परिसरात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. बालाजी चित्रपटगृहासमोर आता बेकायदा झापडपट्टी निर्माण झाली आहे. यातील अनेकांनी जागा अपुरी पडू लागल्याने आपले संसार थेट रस्त्यावरच थाटले आहेत.  कोपरखैरणे नोडमध्ये वाढीव बांधकामे झाल्याने हा परिसरात अगोदरच बकाल झाला आहे. यात या झोपडय़ांची भर पडत आहे.  रेल्वे स्टेशन परिसरात तर कोणीही या रस्त्यावर दुकाने थाटा असा प्रकार सुरू आहे. पदपथाच्या संरक्षक कठडय़ांचा वापर कपडे वाळत टाकण्यासाठी केला जात आहे. तर पदपथावरच स्वयंपाक, धुणी-भांडी केली जात आहेत. रात्री आडोसा करीत ही कुटुंबे या ठिकाणीच झोपत आहेत. रेल्वे रुळांलगतही झोपडय़ा वाढत आहेत. याबाबत पालिका विभाग अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

पादचाऱ्यांना दमदाटीयेथील पदपथाला संरक्षक कठडे आहेत. पादचारी पदपथावरून चालत असताना हे बेकायदा संसार आडवे  येतात. कोणी काय बोलल्यास त्यांना दमदाटी केली जात आहे. नाइलाजाने रस्त्यावर येत गर्दीतून पादचाऱ्यांना मार्ग काढावा लागत आहे.

हे बेकायदा संसार आता नव्याने सुरू झालेले नाहीत. अनेक वर्षे हा प्रकार सुरू आहे. त्यांनी पदपथच बळकावले आहेत. प्रशासन मात्र याकडे डोळेझाक करीत आहे. या लोकांच्या दादागिरीला नाकारिकांना तोड द्यावे लागत आहे.
– अर्जुन कातखडे, रहिवासी