‘कॅल्शियम कार्बाइड पावडर’च्या वापराची शक्यता?

नवी मुंबई कोकणातील हापूस आंब्याची आवक वाढल्याने त्याला झटपट पिकविण्यासाठी काही व्यापारी अथवा खरेदीदार कॅल्शियम कार्बाइड पावडरचा वापर करण्याची शक्यता लक्षात घेऊन तुर्भे येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) फळ बाजारावर अन्न व औषध विभागाची करडी नजर आहे. अन्न व औषध विभागाने कॅल्शियम कार्बाइड पावडरला पर्याय म्हणून इथोफॉन पावडर वापरण्याची मुभा दिल्याने आता बहुतांशी व्यापारी हे याच पावडरचा वापर आंबा पिकविण्यासाठी करीत आहेत.

कोकणातील हापूस आंब्याचा मोसम आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे आवक मोठय़ा प्रमाणात वाढली असून सोमवारी ९० हजार हापूस आंब्याच्या पेटय़ा बाजारात आल्याची नोंद आहे. मंगळवारी ही आवक वीस हजाराने कमी झाली आहे. याच वेळी कर्नाटकमधील हापूस आंब्याची आवक सुरू झाली असून या आंब्याच्याही ४० ते ५० हजार पेटय़ा बाजारात येऊ लागल्या आहेत. त्यामुळे एकाच वेळी घाऊक बाजारात सव्वा लाख हापूस आंब्याच्या पेटय़ा डेरेदाखल होऊ लागल्या आहेत. अशा वेळी हापूस आंबा झटपट पिकवण्याची अहमहमिका व्यापारी व खरेदीदारांमध्ये सुरू होत असल्याचा अनुभव आहे.

अन्न व औषध विभागाने तीन वर्षांपूर्वी आंबा पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडच्या पुडय़ा वापरण्यास मज्जाव केला आहे. त्यासाठी काही हापूस आंब्याच्या पेढय़ांवर धाडी टाकून आंबा जप्त करण्यात आला होता. कॅल्शियम कार्बाइडने हापूस आंबा पिकवण्यामुळे कॅन्सरसारखा असाध्य आजार होण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. त्यामुळे गेली तीन वर्षे आंबा पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर करण्यास व्यापाऱ्यांनी हळूहळू बंद केले आहे. मात्र व्यापाऱ्यांकडून कच्चा हापूस आंबा विकत घेऊन तो किरकोळ बाजारात विकताना झटपट पिकवण्यासाठी खरेदीदार कॅल्शियम कार्बाइडचा वापर करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अन्न व औषध विभागाची या खरेदीदारांवर करडी नजर आहे.

कॅल्शियम कार्बाइडला पर्याय म्हणून इथोफॅन पावडरचा वापर करण्यास मुभा देण्यात आली असून या पावडरमुळे इथिलिन वायू तयार होऊन हापूस आंबा पिकत असल्याचे दिसून येते. त्यामुळे ह्य़ा पावडरच्या वापरावर आता व्यापाऱ्यांनी जोर दिला आहे. तरीही अन्न व औषध विभागाची एपीएमसीच्या फळबाजारावर करडी नजर आहे. कॅल्शियम कार्बाइडपेक्षा इथोफॅन पावडर स्वस्त असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

अन्न व औषध विभागाची तपासणी अधूनमधून सुरू असते. गेली तीन वर्षे कॅल्शियम कार्बाइडला व्यापाऱ्यांनी अलविदा केले आहे. त्यामुळे त्याला पर्याय असलेल्या इथोफॅन पावडर अथवा रॅपलिंग चेंबरमध्येच हापूस आंबे पिकवून ग्राहकांना दिले जात आहे. त्यामुळे ग्राहकांनी आता निश्चिंत राहावे

– संजय पानसरे, माजी संचालक, फळ बाजार, एपीएमसी