रविवारच्या घटनेमुळे अग्निशमन यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मसाला मार्केटमधील दोन बंद गाळ्यांना रविवारी दुपारी आग लागली. त्यात जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मात्र मोठय़ा प्रमाणात झाली. आग विझवण्यासाठी येणाऱ्या अग्निशमन दलाच्या वाहनाला मसाला मार्केटजवळ वळण घेत असताना अपघात झाला. त्यात अग्निशमन दलाचे दोन कर्मचारी जखमी झाले.

एपीमसाला मसाला मार्केटमधील बी विंगच्या ३३ व ३४ क्रमांकाच्या गाळ्यांना रविवारी दुपारी १च्या सुमारास आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता पालिका अधिकांऱ्यानी व्यक्त केली आहे. या बंद गाळ्यांमध्ये दगडफूल, तेजपत्ता अशा मसाल्याच्या पदार्थासह आयुर्वेदिक वनौषधींचा साठा होता. हे पदार्थ पेटल्याने मोठय़ा प्रमाणात धूर पसरला होता. आग मोठी असल्यामुळे ती आटोक्यात आणण्यासाठी अधिक प्रमाणात पाण्याचा मारा करावा लागत होता. त्यासाठी वाशीतील अग्निशमन दलाच्या गाडय़ा घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. एकापाठोपाठ एक बंब पाठवण्यात येत होते. यापैकीच एका वाहनाला अपघात होऊन चालक परमेश्वर अरेनवुरू व अग्निशमन जवान संतोष जाधव जखमी झाले. त्यांना वाशीतील पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी प्रभाकर गाढे यांनी दिली. तब्बल पाच तासानंतर म्हणजे संध्याकाळी सहाच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.

या आगीमुळे एपीएमसी आवारात अत्यावश्यक प्रसंगी पाणी पुरवठा करणाऱ्या पीलर पोस्ट हायड्रन्टची व्यवस्थाच नसल्याचे निदर्शनास आले आहे. नवी मुंबई पालिका प्रशासनाने एपीएमसीच्या या हलगर्जीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. घाऊक बाजारात अशा प्रकारच्या आगींची शक्यता असल्याने बाजारात एक कायम स्वरुपी अग्निशमन केंद्र असावे, अशी मागणी एपीएमसी प्रशासाने केली आहे. हाकेच्या अंतरावर वाशी केंद्र असल्याने अशा स्वतंत्र केंद्राची तूर्त आवश्यकता नसल्याचे पालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी घाऊक बाजारपेठे तुर्भे सेक्टर १९ मध्ये आहे. या ठिकाणी कांदा बटाटा, धान्य, मसाला, आणि फळ व भाजी असे पाच घाऊक बाजार असून या ठिकाणी दिवसाला तीन हजार कोटीची आर्थिक उलाढाल होते. सिडकोने या घाऊक बाजारपेठेची उभारणी केली असून त्याच्या संचलनाची जबाबदारी एपीएमसीवर सोपविण्यात आली आहे. नवी मुंबई पालिकेच्या अग्निशमनदलाने रविवारच्या आगीची चौकशी केली असता या भागात कुठेही हायड्रन्ट नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पालिकेच्या अग्निशमन दलाला बाहेरून टँकरने पाणी आणावे लागले. पालिकेने या गैरसोयीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एपीएमसीच्या पाच घाऊक बाजारांत पुरेशी शौचालये आणि पार्किंगची व्यवस्था नाही, हे प्रशासनाने एपीएमसीच्या लक्षात आणून दिले आहे. वाहनांची संख्या वाढल्याने बाजाराच्या आवाराबाहेर सकाळी वाहने उभी राहातात आणि वाहतूककोंडी होते.

मसाला बाजारातील आगीच्या पाश्र्वभूमीवर सोमवारी प्रशासनाबरोबर एक तातडीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी घाऊक बाजारात अनेक ठिकाणी हायड्रन्ट नसल्याचे निर्दशनास आले. त्याचप्रमाणे बाजारात अनेक समस्या निर्माण झालेल्या असून त्यावर वेळीच तोडगा काढण्याची आवश्यकता असल्याचे एपीएमसीला सुचविण्यात आले आहे.

– अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई पालिका