मच्छीमारांचा गोंधळ, करंजा जेटीचे काम अपूर्ण, मुख्यमंत्र्याचे अद्याप आदेश नाहीत

राज्यातील मच्छीमारांना बार वाव (नॉर्टिकल) क्षेत्राबाहेर पर्ससिन जाळ्यांनी मासेमारी करण्यास परवानगी द्यावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने दहा अटी घातल्या आहेत. या अटी व शर्तीमुळे मच्छीमारांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. या परिपत्रकात नमूद करण्यात आलेल्या करंजा मच्छीमार जेटीचे काम अपूर्ण असतानाही त्याची परवानगी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.या अटी पूर्ण करून त्याचा अर्ज विभागीय मत्स्यव्यवसाय आयुक्तांकडे दिल्यानंतरच ही परवानगी देण्यात येणार आहे.

या निर्णयामुळे मच्छीमारीसाठी बंदी घातलेल्या परिसरात मासेमारी करता येणार आहे; मात्र मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात कोणतेही लेखी आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे दिलेल्या आदेशानुसार असा उल्लेख करून ५ जुलैला या मासेमारीच्या परवानगीसाठी दहा अटी असलेले परिपत्रक जाहीर केले आहे. मत्स्यबीज आणि जैवविविधतेच्या संरक्षणासाठी किनाऱ्यापासून पाच वाव क्षेत्रात मासेमारी करण्यास बंदी आहे, तर मर्यादित स्वरूपात १२ वावपर्यंत मासेमारी करता येते. १२ वावच्या पलीकडे पर्ससिन जाळ्याने मासेमारी करण्यास शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर बेरोजगारीची पाळी आली होती. या संदर्भात उरणचे नगराध्यक्ष महेश बालदी यांनी मच्छीमार नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलावली होती. यात मुख्यमंत्र्यांनी खोल समुद्रात मासेमारीस परवानगी देण्याचे आश्वासन दिलेले होते. त्यानुसार मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने मत्स्यव्यवसाय आयुक्तांना ५ जुलै रोजी एक परिपत्रक पाठविले. यात १२ नॉटिकलच्या पुढे मच्छीमारीसाठी दहा अटी घालण्यात आल्या आहेत.

अटी काय आहेत?

  • विशाल आर्थिक क्षेत्र म्हणून संबोधण्यात येणाऱ्या या क्षेत्रात मासेमारी बोटीवर ‘व्हेसल ट्रॅकिंग सिस्टीम’ बसविणे बंधनकारक
  • ही यंत्रणा बसवण्यासाठी केंद्रीय दळणवळण मंत्रालयाची परवानगी घ्यावी
  • मंत्रालयाने निश्चित केलेल्या एजन्सीमार्फतच ही यंत्रणा बसवावी
  • यंत्रणेत बोटीच्या मालकाचे नाव, व्हीआरसी क्रमांक, व्हीटीएस आयडी तसेच डीपीआय नमूद करणे.
  • नौकेवरील खलाशांना बायोमेट्रीक कार्ड, ओळखपत्र बंधनकारक.
  • व्हीटीएसचा सांकेतिक क्रमांक मत्स्यव्यवसाय विभाग, सागरी पोलीस, तटरक्षक दल व नौदल यांना कळविणे आवश्यक.
  • नौकांना रंग संकेतांक द्यावा.
  • नौकेचा नोंदणी क्रमांक गडद निळ्या रंगात २ बाय ३ फूट इतक्या आकारात असावा. ‘ट्रॅक डाटा’ मत्स्यविभागाकडे सादर करावा.
  • नौकेने पकडलेली मासळी विभागाने ठरविलेल्याच बंदरात उतरविण्यासाठी त्या बंदराची आगाऊ परवानगी घ्यावी.

अटी पूर्ण करून इच्छिणाऱ्या मच्छीमारांनी आपले अर्ज साहाय्यक मत्स्यविभाग आयुक्त किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करावेत. त्यानंतर हे अर्ज मंत्रालयाकडे परवानगीसाठी पाठविण्यात येतील.

-अविनाश नाखवा, आयुक्त, विभाग साहाय्यक मत्स्यविभाग रायगड</strong>