आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे पर्यावरणमंत्र्यांचे सिडकोला आदेश

नवी मुंबई : सीवूड्स येथील पानथळ जागेतील बहुमजली निवासी संकुले व गोल्फ मैदानाचा वादात अडकलेला प्रकल्प रद्द होण्याची शक्यता आहे. सोमवारी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबतचा सविस्तर पुर्नप्रस्ताव सादर करण्याचे आदेश देत पाणथळ जागा संरक्षित कराव्यात आशा सूचना सिडकोला दिल्या. तसेच या ठिकाणी फ्लेमिंगो अभयारण्य उभारण्याबाबत अहवाल सादर करण्यासही सांगितले आहे.

बहुमजली निवासी संकुले व गोल्फ मैदान बनविण्याबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यात सिडकोच्या परवानगीने मिस्त्री कंन्स्ट्रक्शन यांनी ७२४ झाडे तोडल्याने नवा वाद निर्माण झाला होता. याबाबत याचिकाकर्ते पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार घेऊन गेले होते. सोमवारी  या संदर्भात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, नगरविकास विभाग एकचे प्रधान सचिव नितीन करीर, पर्यावरणप्रेमी व याचिकाकर्ते सुनील अग्रवाल यांच्याबरोबर आदित्य ठाकरे यांची बैठक झाली. या बैठकीत वरील आदेश देण्यात आले आहेत.

सीवूड्स सेक्टर ६० एनआरआय सोसायटीच्या ऐ,बी,सी डी व ई ब्लॉकमधील मागील बाजूस असलेल्या ३३.५५ हेक्टर जागेवर सिडको गोल्फ कोर्स व बहुमजली निवासी संकुल उभारत आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर २०१७ मध्ये ही जागा पाणथळ म्हणून जाहीर केली आहे. असे असताना या ठिकाणी हा प्रकल्प सिडको मनमानी करीत उभारत असल्याने पर्यावरणप्रेमींनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याबाबत कोणताही निर्णय झालेला नसताना या ठिकाणी वृक्षतोड व भराव होत असल्याने याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेत याबाबत एनआरआय पोलिसांत तक्रार दिली आहे. असे असतानाही सिडकोच्या परवानगीने येथील २.७ हेक्टर जागेवरील ७२४ झाडे ठेकेदाराने तोडली आहेत. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी तत्काळ काम थांबवण्याचे आदेश देत स्वत: पाहणी करणार असल्याचे सांगितले होते.

सोमवारी झालेल्या बैठकीत सिडकोने पाणथळ जागांचे संरक्षण करावे असे निर्देश देत गोल्फ कोर्स तसेच गृहनिर्माण संकुलाचा पुनप्र्रस्ताव सादर करावे असे निर्देश दिले आहेत. तसेच या ठिकाणी फ्लेमिंगो अभयारण्य बनवण्याबाबतचा प्रस्ताव सादर करा असे सिडकोला सांगितले आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांना संपर्क केला असता होऊ शकला नाही.

या पाणथळ जागेबाबत न्यायालयात दाद

मागितली आहे. असे असताना सिडको मनमानी करत आहे. ही बाब सोमवारच्या बैठकीत पर्यावरणमंत्र्यांसमोर मांडली. येथील २.७ हेक्टर जागेवरच वृक्ष व जमीन असून इतर सर्व जागा पाणथळ आहे. त्यामुळे सिडकोच्या ३३.५५ हेक्टर जागेवरच प्रश्नचिन्ह आहे.

– सुनील अग्रवाल, याचिकाकर्ते, तक्रारदार

बैठकीत पाणथळ जागा संरक्षित करण्याबाबत व फ्लेमिंगो अभयारण्य बनवण्याबाबत चर्चा झाली. रहिवासी क्षेत्र असलेल्या बाजूला संरक्षित भिंत न बांधता पाणथळ संरक्षित करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. येथील संपूर्ण जागेबाबतचा पुनप्र्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे.

-नितीन करीर,प्रधान सचिव, नगरविकास विभाग एक