लसणाच्या भावात ३५-४० रुपयांची वाढ

भाज्या, कांदे-बटाटे इत्यादींच्या किमतीत घट झाल्यामुळे गृहिणी आंनदात असल्या तरी लसणाच्या वाढत्या किमतीमुळे स्वस्त भाज्यांना आता महागडी फोडणी द्यावी लागणार आहे. भाज्या, वरणासारख्या शाकाहारी पदार्थात आणि मांसाहारातही लसूण मोठय़ा प्रमाणात वापरला जातो. त्यामुळे किमतीतील वाढीची झळ सर्वसामान्यांना पोहोचणार आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) घाऊक बाजारात लसणाचा दर १३५ ते १४० रुपये प्रति किलोवर पोहचला आहे. तर किरकोळ बाजारात लसणाने १६० ते २०० रुपयांपर्यंत मजल मारली आहे. वाशी बाजारात राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशातून लसणाची आवक होते, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

वाशी बाजारात नेहमी लसणाच्या ८ ते १० गाडय़ा येतात. मात्र सध्या केवळ ६ ते ७ गाडय़ा बाजारात येत असून ८० टन मालाची अवाक होत आहे. ऑक्टोबरमध्ये एपीएमसीत लसणाचे दर ६० ते ८०  रुपये प्रति किलो होते. नोव्हेंबरमध्ये ते १०० ते ११० रुपये प्रति किलो झाले. दोन महिन्यांत दोनदा दरवाढ झाली आहे.

वाशी बाजारात डिसेंबरअखेर व जानेवारीत नवीन लसणाची आवक सुरू होते, मात्र अद्याप नवीन लसूण आलेला नाही, त्यामुळे भाववाढ झाली आहे. नवीन लसणाची आवक वाढल्यानंतर लसणाचे दर कमी होतील

– अशोक वाळूंज, व्यापारी एपीएमसी