पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाचा तपास संथ गतीने सुरू आहे. पोलीस अधिकारीच आरोपी असल्याने तपासात ढिलाई येत आहे, असा आरोप अश्विनीच्या नातेवाईकांनी केला आहे. गुरुवारी त्यांनी आपली कैफियत पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्यासमोर मांडली. तसेच न्यायालयात आणखी पुरावे देण्याची मागणी केली.

वसई येथील खाडीत टाकलेल्या अश्विनी बिद्रे यांच्या मृतदेहाचा शोध पुन्हा सुरू करून ज्या शस्त्राने त्यांची हत्या करण्यात आली, ते शस्त्र शोधून काढावे, अशी मागणी नातेवाईकांनी केली. हे शस्त्र अद्याप हस्तगत करण्यात आलेले नाही. त्यामुळे या प्रकरणात पुरेसे पुरावे हाती लागलेले नाहीत. सबळ पुरावे देण्याची मागणीही त्यांनी केली.

तपास अधिकारी संगीत अल्फान्सो यांना तत्कालीन आयुक्त हेमंत नागराळे यांनी अचानक दूर करून मदत केल्याचा आरोप होत आहे. मायकेल आणि जेकब नावाच्या आरोपीने दिलेल्या जबाबात आणखी १० माणसे यावेळी बोलवण्यात आली असल्याचे कळते. ही माणसे कोण आहेत, याचा शोध घ्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या हत्येत सहभागी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. आरोपी अभय कुरुंदकर यांनी अश्विनी यांच्या भावाला धमकावल्याचा आरोप त्यांनी केला.