अण्णासाहेब पाटील जयंतीनिमित्त आयोजित मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

नवी मुंबई : बाळासाहेब ठाकरे आणि अण्णासाहेब पाटील यांचे स्वप्न साकार करण्यासाठी समर्थ महाराष्ट्र निर्माण करण्याचा आपण सगळे प्रयत्न करूया, असे आवाहन करीत सरकार मराठा आरक्षणाची लढाई जिंकणारच, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी व्यक्त केला. माथाडी कामगारांचे स्वर्गीय नेते अण्णासाहेब पाटील यांची ८७ वी जयंती शुक्रवारी माथाडी कामगारांचा ऑनलाइन मेळावा घेत साधेपणाने साजरी करण्यात आली. या वेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले,  गेल्या वर्षी संघटनेच्या सुवर्ण महोत्सवाच्या कार्यक्रमात हजारो माथाडी कामगारांच्या मेळाव्याला मी उपस्थित होतो, त्या वेळी संघटनेने ज्या-ज्या समस्या मांडल्या त्या माझ्यासमोर आहेत. या सर्व समस्यांची मुख्यमंत्री म्हणून मी सोडवणूक करणार आहेच. तसेच मराठा आरक्षण ही न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी सरकार शर्तीचे प्रयत्न करणार आहे.

माथाडी कायदा अधिक सुरक्षित होण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यांनी बाजार समिती नियमन मुक्तीचा माथाडी कामगारांवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. यामुळे शेतकरी व कामगारांचा फायदाच होणार असल्याचे सांगितले. मराठा आरक्षण ही न्याप्रविष्ट बाब आहे, तरीही सर्वांनी एकत्र येत ही न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ज्या दिवशी ही लढाई आपण जिंकू तीच अण्णासाहेबांना आदरांजली असेल, असे शेवटी सांगितले.

राज्याचे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी, मी माथाडी कामगारांच्या गहन समस्या ऐकलेल्या आहेत. या सर्व समस्या शासनासमोर मांडून आमचे मंत्रिमंडळ संयुक्तपणे त्यावर निश्चित तोडगा काढेल अशी ग्वाही मी सरकारद्वारे देतो, असे सांगत कामगारांना आश्वस्त केले.

प्रास्ताविकात माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी, सरकारने बाजार समित्यांचे नियमनमुक्त करण्याचा आदेश काढला पण अजूनही शेतकऱ्यांना न्याय कसा मिळत नाही असा प्रश्न उपस्थित करीत माथाडी कामगार हे शेतकऱ्यांचीच  मुले आहेत. बाजार समित्या टिकल्या पाहिजेत आणि बाजार समित्याद्वारे व्यवहार सुरू राहिले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. या वेळी त्यांनी माथाडी कामगारांना विमा सुरक्षा कवच म्हणून ५० लाख रुपये मिळावेत तसेच मुख्यमंत्री निधीतून माथाडी रुग्णालयाला १० कोटींचे आर्थिक साहाय्य मिळावे अशी मागणी केली. तसेच अण्णासाहेबांच्या काळात महामंडळ असते तर मराठा समाजाला आरक्षणाची गरज भासली नसती असे सांगितले.

विधान परिषदेचे आमदार व माथाडी नेते शशिकांत शिंदे यांनी नवीन कायद्यांमुळे भांडवलशाही वाढू नये यासाठी आपण सर्वांनी संघटित प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले.  या मेळाव्यात आठ माथाडी कामगारांना ‘माथाडी भूषण’ हा पुरस्कार सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युनियनचे जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख यांनी केले तर आभार अध्यक्ष एकनाथ जाधव यांनी मानले.