तापमानवाढीमुळे उत्पादन कमी; घाऊकमध्ये प्रतिकिलो ५० रुपयांवर

वरणापासून भाजीपर्यंतच्या प्रत्येक पदार्थाला झणका आणणारी हिरवी मिरची सध्या सर्वसामान्यांच्या खिशालाच ‘तिखट’ लागू लागली आहे. तापमानवाढीमुळे उत्पादन घटल्याने वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजारात मिरचीची आवकही कमी झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात मिरचीचे दर ५० रुपये किलोंवर पोहोचले आहेत. घाऊक बाजारातील ही महागाई ‘स्वस्त’ वाटावी, अशी परिस्थिती किरकोळ बाजारात असून मुंबई, ठाण्यासह अन्य शहरांतील किरकोळ बाजारात तब्बल १०० रुपये किलो दराने मिरची विकली जात आहे.

महाराष्ट्रातील मिरचीखालील एकूण क्षेत्रांपैकी ६८ टक्के क्षेत्र नांदेड, जळगाव, धुळे, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, उस्मानाबाद या जिल्हय़ांत आहे. गेल्या काही महिन्यांत या जिल्ह्य़ांमध्ये झालेला अवेळी पाऊस आणि नंतर तापमानात अचानक झालेली वाढ या दोन्हींचा विपरीत परिणाम मिरची पिकावर झाला आहे. परिणामी एरवी वाशी येथील घाऊक बाजारात होणारी दोन ते तीन हजार क्विंटल मिरचीची आवक सध्या एक हजार क्विंटलवर घसरली आहे. याचा परिणाम मिरचीच्या घाऊक दरांवर झाला आहे. जानेवारी महिन्यात घाऊक बाजारात मिरची ३० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात होती. मात्र, सध्या घाऊक बाजारातील दर ५० रुपयांवर पोहोचले आहेत. याचा गैरफायदा घेत किरकोळ विक्रेत्यांनी मिरचीचे दर दुप्पट केले असून तेथे हिरवी मिरची १०० ते १२० रुपये किलो दराने विकली जात आहे.

साठवणुकीचाही फटका

कर्नाटक, मध्य प्रदेशातून येणारी मिरची मुंबईकरांच्या जास्त आवडीची आहे. अशीच तिखट मिरची कोल्हापूर, सांगली, नाशिक, गुजरातमधील नवसारी येथूनही येते. पुसा ज्वाला, संकेश्वरी, बेडगी, लवंगी या मिरच्यांना बाजारात अधिक मागणी असते. मात्र, ही मिरची वाळवून मसाला वा मिरची पूड करण्यासाठीही तिचा वापर केला जातो. यामध्ये जास्त उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी तसेच व्यापाऱ्यांनी त्या दृष्टीने मिरचीची साठवणूक सुरू केली आहे. यामुळेही बाजारात मिरची कमी प्रमाणात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शेतकऱ्यांचे नुकसान

मिरची उत्पादनासाठी लागणारी बिजाई महाग असते. या पिकाची खूप काळजी घ्यावी लागते. मिरची तोडण्यासाठी शेतमजुरांना प्रतिदिन दोनशे रुपयांची मजुरी द्यावी लागते. मात्र, मध्यंतरी झालेल्या गारपिटीमुळे मिरचीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.